संतराजमहाराज पालखीचे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:21 AM2018-07-10T01:21:06+5:302018-07-10T01:21:29+5:30
श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पावसाच्या धारा झेलत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता.
केडगाव - श्रीक्षेत्र संगम (ता. दौंड) येथील संतराजमहाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पावसाच्या धारा झेलत प्रस्थान झाले. पावसाच्या सरी, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, वारकरी, टाळकरी, विणेकरी, खांदेकरी, पताकावाले यांनी धरलेला ठेका मन आनंदून सोडत होता. मुळा-मुठा व भीमा नदी यांच्या संगमावरील पुलावर पालखी सोहळा कोंडेवस्तीकडे येताना वारकरी पैलतीरावर बसून डोळ्यांमध्ये साठवत होते. पालखी सोहळ्याचे ५१ वे वर्ष असून, चालूवर्षी या सोहळ्यामध्ये पहिल्याच दिवशी सुमारे १० हजारांच्यावर भाविक सहभागी झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. आज सकाळी सोहळ्यानिमित्त संगमेश्वराचा अभिषेक झाला. त्यानंतर संस्थानास ५० लाख रुपये किमतीची १ एकर जमीन देणगी स्वरूपात देणाऱ्या बाळासाहेब किसन थोरात व संजय किसन थोरात यांचा संस्थानच्यावतीने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी सन्मान केला.
पालखी, पादुका, मानाचा हिरा अश्व, संगमेश्वर यांचे पूजन करण्यात आले. यावर्षी मारुती बोत्रे यांच्या हिरा-तुरा या खिलारी बैलजोडीस पालखीरथ ओढण्याचा मान मिळाला आहे. तसेच माऊली ताकवणे सांभाळ करीत असलेला हिरा अश्व वारीत सहभागी झाला आहे. पालखीरथाची फुलांनी सजावट मच्छिंद्र अडागळे यांनी, दुरुस्ती गजानन झांजे यांनी केली आहे. नगारारथ ओढण्यासाठी महिपती शितोळे यांची बैलगाडी आहे.
पावसासाठी साकडे
चालूवर्षी पाऊस लांबलेला आहे. त्यामुळे काहीशा चिंतेतच वारकरी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यावर्षी लांबलेला पाऊस पडू दे व शेतकरी दुष्काळमुक्त होऊ दे, असे साकडे वारकºयांनी पांडुरंगास प्रस्थानावेळी घातले.
सोहळा संगम येथून निघाल्यानंतर मजल दरमजल करीत सोहळा न्याहरीसाठी कोंडेवस्तीवर विसावला. कोंडे परिवाराच्यावतीने ५ क्विंटल खिचडीवाटप करण्यात आली. सोहळा अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर देलवडीकडे मार्गस्थ झाला.
देलवडी ग्रामस्थांनी रांगोळी, पायघड्या व स्वागतकमानी उभारून सोहळ्याचे स्वागत केले. हा सोहळा मुक्कामासाठी एकेरीवाडी येथे स्थिरावला. या कार्यक्रमासाठी शांतिनाथ महाराज, बबनराव पाचपुते, रमेश थोरात, रंजना कुल, अशोक पवार, पांडुरंग राऊत, प्रदीप कंद, झुंबर गायकवाड, राणी शेळके, वैशाली नागवडे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, वैशाली आबणे, सुशांत दरेकर, सुरेश महाराज साठे आदी उपस्थित होते.