बर्ड फ्लूला सामोरे जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:06+5:302021-01-09T04:09:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बर्ड फ्लूची संभाव्य साथ बघता जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कृषी आणि पुशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बर्ड फ्लूची संभाव्य साथ बघता जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात कृषी आणि पुशुसंवर्धन विभागातर्फे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. साथीला सामोरे जाण्याची पूर्वतयारी करण्यात आली असून शुक्रवारपासून ही पथके कार्यरत होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन आणि कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.
देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरलेली आहे. राज्यात या साथीचा शिरकाव झाला नसला तरी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने याची पूर्ण तयारी केली आहे. जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झालेला नसला तरी खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील १३ तालुक्यांत जिल्हा परिषदेकडून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. पशुसंवर्धन उपायुक्त यांनी त्यासाठी ६५ पशुवैद्यकांची नेमणूक केली आहे. याचे समन्वयक म्हणून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे हे काम पाहणार आहेत.
सभापती बाबूराव वायकर म्हणाले, जिल्ह्यामध्ये पोल्ट्रीची संख्या सर्वाधिक आहे. हिवाळ्यामध्ये उजनी आणि जिल्ह्यातील धरणांच्या जलाशयांमध्ये परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्यापासून बर्फीचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. शेतकरी, कुक्कुटपालन व्यावसायिक यांच्यामध्ये जनजागृती केली जात आहे. यासाेबतच दक्षता घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना करण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावरील पथकांकडून बर्ड फ्लू संदर्भातील दैनंदिन अहवाल घेतला जाणार आहे. संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास तत्काळ उपचारासाठी पथकांना आवश्यक ती औषधे व साधनसामग्री देण्यात आली आहे.