दहा हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात
By admin | Published: February 21, 2017 03:20 AM2017-02-21T03:20:51+5:302017-02-21T03:20:51+5:30
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी होत असलेल्या मतदानासाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी होत असलेल्या मतदानासाठी तब्बल दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. या बंदोबस्तावर स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व सह आयुक्त सुनील रामानंद लक्ष ठेवून असणार आहेत.
मागील महापालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्यावर्षी मतदान केंद्र आणि मतदार संख्येमध्ये झालेली वाढ पाहता पोलिसांनी बंदोबस्तामध्येही वाढ केली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांसह जिल्हा परिषदेचाही काही भाग आयुक्तालयामध्ये येतो. त्यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी मतदान यंत्रांच्या वाटपापासूनच बंदोबस्त लावण्यात आला आहे.
अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, प्रदीप देशपांडे यांच्यासह सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक तसेच उपनिरीक्षक बंदोबस्तामध्ये तैनात राहणार आहेत. शहर पोलिसांसोबतच गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दलाची पथके बंदोबस्तामध्ये नेमण्यात आली आहेत.