‘रुपी’च्या ठेवीदारांचा अधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: March 5, 2016 12:37 AM2016-03-05T00:37:50+5:302016-03-05T00:37:50+5:30
बुधवारी सासवडच्या रुपी बँकेत खळबळ उडाल्याने गुरुवारी (दि. ३) बँकेच्या १०० खातेदारांनी बँकेत दिवसभर ठिय्या मांडला.
खळद : बुधवारी सासवडच्या रुपी बँकेत खळबळ उडाल्याने गुरुवारी (दि. ३) बँकेच्या १०० खातेदारांनी बँकेत दिवसभर ठिय्या मांडला. त्या खातेदारांना साह्य करण्यासाठी इतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमून बँक व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे शेवटी त्यांनी बँकेचे जनरल मॅनेजर एन. वाय लोखंडे यांना बोलावून घेतल्यानंतर, त्यांनी सर्व खातेदारांची समजूत काढली.
दरम्यान, ‘आम्ही आता गप्प बसणार नाही.’ असा निर्णय घेऊन येत्या मंगळवार, दि. ८ रोजी बँकेच्या दारातच तालुक्यातील खातेदारांचा जाहीर मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याला बँकेचे प्रशासक मंडळ उपस्थित न राहिल्यास, यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला.
एका महिलेने सासवड शाखेत विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बँक व्यवस्थापनाची पळता भुई थोडी झाली. या घटनेमुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली. उपस्थित असणाऱ्या सर्वच शेतकरी खातेदारांनी शाखाधिकारी व्ही. व्ही. बहुलेकर यांना धारेवर धरत असताना, त्यांनी अक्षरश: बैठकीतून पळ काढला. याबाबत वृत्त प्रसारित होताच या महिलेला ५० हजार रुपयांचा धनादेश थेट खात्यात जमा केला.
दुपारी चार वाजता लोखंडे बँकेत आल्यानंतर, त्यांची प्रशासनाच्या वतीने त्यांची बाजू मांडली. मात्र, तरीही त्यांचे समाधान न झाल्याने शेवटी मंगळवार, दि. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या दारात जाहीर मेळावा घेण्याचे निश्चित करून या बैठकीत बँकेचे सर्व प्रशासक उपस्थित करावे, अशी मागणी लोखंडे यांच्याकडे करण्यात आली. या बैठकीत ठोस निर्णय न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्यास त्याच क्षणी यापेक्षा मोठे आंदोलन उभारून प्रशासनाला धारेवर धरण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी जवळपास ६ वाजता ठिय्या आंदोलन थांबविण्यात आले.
(वार्ताहर)