वाहन विमा नुतनीकरणातल्या उदासिनतेचा बसू शकतो फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:30+5:302020-12-30T04:14:30+5:30
पुणे : नवीन वाहन घेताना विमा काढणे बंधनकारक आहे. पण विम्याची मुदत संपल्यानंतर त्याच्या नुतनीकरणाबाबत वाहनचालकांमध्ये उदासीनता दिसून येते. ...
पुणे : नवीन वाहन घेताना विमा काढणे बंधनकारक आहे. पण विम्याची मुदत संपल्यानंतर त्याच्या नुतनीकरणाबाबत वाहनचालकांमध्ये उदासीनता दिसून येते. प्रामुख्याने नोंदणीला काही वर्ष उलटून गेलेली तसेच १५ वर्षांची नोंदणीची मुदत संपलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा विमा काढण्यात कुचराई केली जात आहे. संकटकाळात या दिरंगाईचा फटका वाहन मालकांना बसू शकतो.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाचा विमा नसेल तर ते बेकायदेशीर कृत्य ठरते. त्यासाठी कायद्यामध्ये २ हजार रुपये दंडाची तरतुद आहे. तसेच सध्या वाहन प्रणालीशी विमा जोडण्यात आल्याने प्रत्येक वाहनाच्या विम्याची नोंद या प्रणालीत होते. त्यामुळे वाहनविषयक कोणतेही काम करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (‘आरटीओ’त) गेल्यानंतर वाहनाचा विमा आहे किंवा नाही, हे दिसते. विमा असल्यासच पुढील कामे होऊ शकतात. प्रवासी किंवा माल वाहतुक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. या प्रमाणपत्रासाठी विमा काढणे बंधनकारक असते. त्यामुळे या प्रकारातील बहुतेक वाहनांचा विमा असतो.
मात्र, दुचाकी व खासगी चारचाकी वाहनांचा विमा नुतणीकरणाचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यातही दुचाकींचा विमा काढण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते. परिवहन विभागातील अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वाहन नोंदणी करतानाच विमा काढला जातो. वाहन नवे असेपर्यंत बहुतेक जण विमा काढत असतात. पण वाहन जुने होत गेल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच १५ वर्ष जुनी झालेली पण नुतणीकरण न केलेल्या वाहनांचा विमाही नसतो. ही वाहने नोंदणी नुतणीकरणाला आल्यानंतरच विमा काढला जातो.
-----------
विमा नसल्याने संभाव्य धोके
- वाहनविषयक कोणतेही काम होणार नाही
- वाहनाचा अपघात किंवा चोरी झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही
- अपघातात मालकाला दुखापत झाल्यास उपचार खर्च स्वत:च करावा लागेल
- अपघातात अन्य व्यक्तीला दुखापत झाल्यास त्याची भरपाई करावी लागेल
- वाहन फिटनेस प्रमाणपत्रासाठी आवश्यक
------------
वाहन विषयक कोणत्याही कामासाठी कायद्यानुसार विमा बंधनकारक आहे. विमा नसल्यास ही कामे होत नाही. विम्याची नोंद वाहन प्रणालीमध्येच होते. त्यामुळे आरटीओमध्ये कामासाठी आल्यानंतर वाहनाचा विमा आहे किंवा त्याची मुदत संपली आहे, हे लगेच समजते.
- संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
---------------
शहरातील वाहनांची संख्या (३० नोव्हेंबरपर्यंत)
वाहनाचा प्रकार संख्या
दुचाकी ३०,९४,७०८
चारचाकी (घरगुती) ७,६१,५००
चारचाकी (ट्रान्सपोर्ट) ३९,७७८
स्कूल बस ३,५१७
रिक्षा ८२,१६९
ट्रॅक्टर २९,०८१
-----------