Video: पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीने फेकली शाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:44 PM2022-03-07T20:44:07+5:302022-03-07T20:51:05+5:30
पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडला या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी केला हा प्रकार
पुणे : पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले आहे. यामुळे पुणे महापालिका आणि भाजपच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने पुण्यात महापौरांच्या कार्यालयात शाई फेकल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
''प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला असल्याचे कार्यकर्ते यावेळी म्हणाले आहेत.''
आम्ही महापौरांच्या अंगावर शाई फेकणार होतो
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. परंतु पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने एक तुकडा खाली पडला. याला जबाबदार महापालिका आयुक्त आणि महापौर आहेत. आम्ही त्यांच्याच अंगावर शाई फेकण्यासाठी आलो होतो. पण ते कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालयातच शाई फेकून निषेध नोंदवला आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
पुण्यात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीने फेकली शाई #Pune#vbapic.twitter.com/M25Dd6gYEe
— Lokmat (@lokmat) March 7, 2022
केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात; राष्ट्रवादीनेही केली टीका
भाजपने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.