उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच चक्रीवादळातील बाधित मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:40+5:302021-06-03T04:09:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेलीसह अन्य तालुक्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेलीसह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये हजारो शेतकरी व लोकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या लोकांना शासनाकडून मदत करण्यात आली खरी पण ही मदत अर्धवट असून, आजही जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्यातील शेकडो बाधित मदतीपासून वंचित आहेत. यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी वारंवार मागणी करूनही निधी उपलब्ध झाला नाही.
जिल्ह्यात जून महिन्यात आलेल्या चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेलीसह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल दीड हजारपेक्षा अधिक घरे, गुरांचे गोठे, पाॅलीहाऊस, कांद्याच्या बराखी, नेटशेडचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कोरोनामुळे या सर्व बाधित लोकांना नुकसानभरपाई देण्यास शासनाकडून उशीर झाला. विरोधी पक्षाने टीका केल्यानंतर तीन-चार महिन्यांनंतर हा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पुणे जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ७७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील शंभर टक्के बाधित लोकांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आणखी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या एक वर्षापासून जिल्ह्यातील हजारो बाधित लोक मदतीपासून वंचित आहे. यात आदिवासी भागातील लोकांच्या घराची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. यामुळे शासनाने तातडीने मदत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
-------
तहसीलदार कार्यालयात वर्षभरापासून पाठपुरावा सुरू आहे. आमच्या गावातील एकाही व्यक्तीला शासनाकडून आलेली मदत मिळालेली नाही. गावातील अनेक लोकांच्या घरावर छप्पर राहिले नाही, पण या सर्व बाधित लोकांनी पदर मोड करून कसेबसे घरावर छप्पर टाकले, पण एक वर्ष झाले शासनाकडून निसर्ग चक्रीवादळाची मदत मिळाली नाही.
- दत्तात्रय सुतार, सदस्य ग्रामपंचायत आंबोली
------