निवड झाल्यानंतरही दोन वर्षांपासून नोकरीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:56+5:302021-02-26T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जाहिरात आली, अर्ज केला, लेखी परीक्षाही पास झाले, वैद्यकीय चाचणी झाली, आता प्रशिक्षणासाठी रुजू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जाहिरात आली, अर्ज केला, लेखी परीक्षाही पास झाले, वैद्यकीय चाचणी झाली, आता प्रशिक्षणासाठी रुजू व्हायचे, तर कोरोना सुरू झाला आणि जिल्ह्यातील एसटीमधल्या पहिल्या महिलाचालक तथा वाहकांची भरती रखडली. लॉकडाऊननंतर सर्व सुरळीत झाले तरी ही भरती अजून रखडलेलीच आहे. जाहिरात पाहून त्यांनी अर्ज केला होता. सर्व परीक्षा पास झाल्यावर त्यांची निवड झाली. पण प्रशिक्षणाअभावी नोकरीपासून त्या वंचित आहेत. आता कुठे कोरोना कमी झाला म्हणून त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार होता, तोच कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने तो विचारही बासनात आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण २८ जागा होत्या. ही भरती प्रथमच होत होती. त्यामुळे जिल्ह्यात एसटीसाठी प्रथमच महिला चालक मिळणार होत्या.
सन २०१९ मध्ये भरतीची जाहिरात आली होती. जिल्ह्यातील एकूण २८ जागांसाठी १०० अर्ज आले. त्यातून काही अपात्र झाले. उर्वरीत उमेदवारांची लेखी परीक्षा झाली. त्यात उत्तीर्ण महिलांची वैद्यकीय चाचणी झाली. त्यात पात्र ठरलेल्यांना महामंडळाचे गाडी चालवण्याचे तसेच अन्य प्रशिक्षण द्यायचे होते. ते सुरू करणार तोच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. टाळेबंदी जाहीर झाली. त्याला आता वर्ष होत आले. एसटी महामंडळाकडून पत्र येईल या प्रतीक्षेत त्या सर्वजणी आहेत.
बहुतेकींची आर्थिक परिस्थिती यथातथाच आहे. पुण्याबाहेरच्या महिलांची संख्या जास्त आहे. त्या धाडसाने अवजड वाहन चालवण्यास शिकल्या. त्यासाठीचा अधिकृत परवाना काढला. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर ही तर मोठीच संधी म्हणून त्यांनी अर्ज केला, तर त्यांच्या भाळी ही प्रतीक्षा आली.
- एसटी महामंडळ, जिल्हा वरिष्ठ अधिकारी
--------------
आम्ही सर्वजणी एकमेकींच्या संपर्कात आहोत. कोरोनाचे सगळे नियम पाळून आमची प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे. वर्ष होऊनही अद्याप काही कळवण्यात आलेले नाही. त्यांचीही अडचण असेल. आम्हाला प्रशिक्षणाबाबतच्या पत्राची अपेक्षा आहे. - मुक्ता जाधव, औरंगाबाद
------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. टॉपवर असताना प्रशिक्षण वर्ग घेता आला नाही मान्य आहे, मात्र आता त्यांनी अधिक विलंब लावू नये, आमची नोकरी सुरू करावी.
- मीनाक्षी कंठाळे, नांदेड
----------