एकवीरा देवी मंदिरातील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:15 PM2018-08-21T23:15:51+5:302018-08-21T23:19:28+5:30
धर्मादाय सहआयुक्तांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश
लोणावळा : कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या मंदिरात सुरू असलेला भ्रष्टाचार, दमदाटी व दहशतीने देणगीच्या पैशावर डल्ला मारला जात आहे. ही अफरातफर व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून विश्वस्त संजय गोविलकर यांच्यासह दोषींवर तातडीने कारवाई करावी. तसेच, या चौकशीचा अहवाल मुख्यालयास सादर करावा, असा आदेश पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त, यांनी नुकतेच दिले.
एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी याबाबत मुख्य धर्मादाय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्याची दखल घेत १ आॅगस्टला हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करीत भाविकांच्या देणगी पैशांवर डल्ला मारणाऱ्या लाभार्थी विश्वस्तांवर कडक कारवाई करावी. अन्यथा भाविकांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, ‘‘ देवस्थानचे लाभार्थी विश्वस्त व पुजारी असलेले संजय गोविलकर यांनी मंदिरात भाविकांची लूट सुरू केली असून, मनमानीपणे भाविकांचे देणगी पैसे व मनिआॅर्डरचे पैसे बॅँकेत जमा न करता परस्पर स्वत:कडे ठेवले जात आहेत. अभिषेकाला येणाºया भाविकांचे पैसे घेतले जातात. मात्र त्यांना पावती न देता पैसे लाटले जात आहेत. देवीला भक्तिभावाने वाहिलेला दागिना हडप केला जात आहे. गोविलकर यांनी याकरिता देवस्थानाच्या व्यवस्थापकांना विश्वस्तांची मीटिंग न घेता धाक दडपशाहीने कामावरून कमी करत देवस्थानामधून पूर्वी कमी केलेल्या लोकांना कामावर घेत भ्रष्टाचार माजविला आहे.’’ एकवीरा देवीच्या मंदिरात मनमानी कारभार करत पैशाची अफरातफर व भ्रष्टाचार करणाºया चार विश्वस्तांवर जुलै महिन्यात निलंबनाची कारवाई करत तसा अहवाल पुणे सहायक धर्मादाय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. लाभार्थी विश्वस्त संजय गोविलकर, विजय देशमुख, काळूराम देशमुख, पार्वतीबाई पडवळ यांचा यामध्ये समावेश आहे. असे असतानादेखील ही मंडळी मंदिरावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
लाभार्थी विश्वस्तांना पदावरून कमी करा असा आदेश धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी नुकताच पारित केला आहे. त्यानुसार घटनादुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती तरे यांनी दिली.
आंदोलनाचा इशारा....
मंदिरात काही लाभार्थी विश्वस्तांनी बाजार मांडला असून, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व पैशांची अफरातफर सुरू केली आहे. भाविकांच्या पैशांची सुरू असलेली ही लूट तातडीने न थांबल्यास भाविकांच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा अनंत तरे, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील, जयेंद्र खुणे, विद्या म्हात्रे आदींनी दिला आहे. या वेळी देवस्थानाचे उपाध्यक्ष मदन भोई, नवनाथ देशमुख, काळुराम देशमुख, मधू भोईर, अरविंद भोईर, दिलीप पाटील उपस्थित होते.