धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार
By admin | Published: February 19, 2016 01:30 AM2016-02-19T01:30:01+5:302016-02-19T01:30:01+5:30
जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्यापही
पुणे : जिल्ह्यातील धरणग्रस्तांच्या वसाहतींचा गावठाण विस्तार करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुनर्वसन होऊन १५ ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अद्यापही अनेक वसाहतींना गावठाण जाहीर करण्यात आलेले नाही. गावठाण विस्तार झाल्यास प्रकल्पग्रस्तांना मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यात धरणग्रस्तांच्या १८५ वसाहती असून, यापैकी केवळ ६९ वसाहतीमध्ये शंभर टक्के गावठाण जाहीर झाले आहेत. यामध्ये काही प्रकल्पांमध्ये ५० किंवा ७५ टक्केच गावठाण जाहीर झाले आहेत. तर अनेक ठिकाणी पुनर्वसन झालेल्या ठिकाणी न जाता धरणाच्या लगतच्या गावाशेजारीच घरे बांधून वस्ती केली आहे.
यामध्ये साडे तीनशेपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून घोषित करणे, त्यापेक्षा कमी लोकसंख्येच्या गावाला लगतच्या ग्रामपंचायतींत समावेश करणे किंवा केवळ एक-दोन गट लगतच्या गावठाणात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे धरणग्रस्तांच्या अनेक समस्या सोडविण्यास मदत होणार असल्याचेही पाटील म्हणाले.