राज्य उत्पादन शुल्काचा उपनिरीक्षक सांगून दारुचे कॅन असलेली कार पळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:25 PM2020-03-18T12:25:26+5:302020-03-18T12:37:37+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला जवानाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : राज्य उत्पादन शुल्क खात्यात पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांनी जप्त केलेली गावठी दारुचे कॅन असलेली कारच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच ती परस्पर सोडून देखील दिल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ११ नोव्हेंबर २०१९ रोजी घडला होता. त्यावर तब्बल ४ महिन्यांनी उघड झाला आहे. .
याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक एस. आर. पाटील यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महिला जवान मिनाज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी आंबेगाव येथील सच्चाई माता मंदिराजवळ एक व्हॅगनॉर कार थांबलेली दिसली. ही कार संशयित वाढल्याने पोलिसांनी कारमधील एकाकडे चौकशी सुरु केली. कारमध्ये पाच हातभट्टी दारुचे कॅन आढळून आले. ही चौकशी सुरु असतानाच तेथे मिनाज शेख ही महिला आली व त्यांनी आपण राज्य उत्पादन शुल्क खात्यात उपनिरीक्षक आहे, अशी बतावणी केली. त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हा दाखल केला असल्याचे खोटे सांगितले. कार व त्यातील व्यक्तीला घेऊन त्या निघून गेल्या होत्या.
याबाबत भारती विद्यापीठ पोलिसांनी घडलेल्या या प्रकाराची माहिती देऊन त्यावर काय कारवाई केली. याची राज्य उत्पादन शुल्क विभागाला पत्र पाठवून चौकशी केली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केली. तेव्हा अशी कोणती कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. चौकशीत महिला जवान मिनाज शेख हिनेच उपनिरीक्षक असल्याचे खोटे सांगून हातभट्टी असलेली कार त्या व्यक्तीला बरोबर घेतले व त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठगगिरी करणार्या महिला जवानावर गुन्हा दाखल केला आहे.