उताऱ्यात कोल्हापूर, गाळपात पुणे विभाग आघाडीवर
By admin | Published: December 28, 2014 11:27 PM2014-12-28T23:27:06+5:302014-12-28T23:27:06+5:30
सहकारी साखर कारखान्यांचा दबदबा : राज्यात पावणेतीनशे लाख टनांचे गाळप
राजाराम लोंढे - कोल्हापूर -राज्यातील १६९ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत पावणेतीनशे लाख टन उसाचे गाळप केले आहे. यामध्ये कोल्हापूर विभागाने साखर उतारा ११.६२ टक्के राखत, तर १ कोटी १२ लाख टन उसाचे गाळप करीत पुणे विभागाने अव्वल स्थान पटकाविले आहे. राज्याचा एकूण साखर उतारा १०.६८ टक्के असला, तरी यामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी आपला दबदबा कायम राखण्यात यश मिळविले आहे.
राज्यात कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर या सात विभागांत उसाचे गाळप केले जाते. यंदा ९७ सहकारी, तर ७२ खासगी साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३ सहकारी, तर तब्बल १२ खासगी कारखाने वाढले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कारखान्यांचा हंगाम सुरू झाला होता. यंदा नोव्हेंबरपासूनच गाळप सुरू झाले. त्यात साखर कारखान्यांची संख्याही वाढल्याने गाळप जास्त होण्यास मदत झाली आहे.
९७ सहकारी साखर कारखान्यांनी आतापर्यंत १ कोटी ७५ लाख ६५ हजार टनांचे गाळप करीत सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के राखला आहे. याउलट खासगी कारखान्यांनी १ कोटी ६४ हजार टन गाळप केले असून ९.२० टक्के उतारा आहे. त्यामुळे उताऱ्यात सहकारी कारखान्यांनी आपला दबदबा कायम राखण्यात यश मिळवले आहे. गाळपात १ कोटी १२ लाख २० हजार टन गाळप करीत पुणे विभागाने राज्यात आघाडी घेतली असली तरी यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे ५८ लाख ९४ हजार टनांचे गाळप झालेले आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. कोल्हापूरने ३९ लाख ७७ हजार टन गाळप केले.
पुणे जिल्ह्यात खासगी कारखाने पुढे
राज्यात बहुतांश जिल्ह्यांत खासगीपेक्षा सहकारी कारखाने उताऱ्यात पुढे आहेत. केवळ पुणे जिल्ह्यात खासगी कारखान्यांचा
उतारा १०.८२ टक्के, तर सहकारीचा १०.२६ टक्के आहे.
यंदा आठ कोटींचे उद्दिष्ट!
राज्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यात उसाचे उत्पादनही चांगले मिळत असल्याने किमान आठ कोटी टनांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी ६ कोटी ९० लाख टन उसाचे उत्पादन झाले होते.
तुलनात्मक गाळप हंगाम
विभागकारखानेगाळपउतारा टक्का
कोल्हापूर३६६९ लाख ९० हजार११.६२
पुणे५७१ कोटी १२ लाख २० हजार११.१४
अहमदनगर२३३८ लाख ४० हजार१०.०९
औरंगाबाद२१२३ लाख ६२ हजार८.८४
नांदेड२६३७ लाख ८३ हजार९.७६
अमरावती०२१ लाख ७५ हजार९.०८
नागपूर०४१ लाख १६ हजार८.०६