इच्छुकांकडून खर्चाला कात्री
By Admin | Published: January 11, 2017 03:53 AM2017-01-11T03:53:20+5:302017-01-11T03:53:20+5:30
नोटाबंदीमुळे रोख रकमेच्या खर्चावर मोठ्या प्रमाणात गडांतर आल्याने इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीसाठी करण्याच्या खर्चावर मर्यादा येत आहेत
पुणे : नोटाबंदीमुळे रोख रकमेच्या खर्चावर मोठ्या प्रमाणात गडांतर आल्याने इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीसाठी करण्याच्या खर्चावर मर्यादा येत आहेत. इच्छुक उमेदवारांना अनेक खर्चांना कात्री लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीवर दुसरा पर्याय शोधून रोख रक्कम जमा करण्याचे प्रयत्न इच्छुकांकडून केले
जात असले तरी त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला आता दोन महिने उलटले असून, दैनंदिन व्यवहार थोडेसे सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. मात्र रोखीने होणाऱ्या मोठ्या व्यवहारांवर गडांतर आले आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्र्श्वभूमीवर बहुतांश इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगलेली होती. ही सर्व रक्कम ५०० व १००० रुपयांच्या नोटांमध्ये होती. मोदी यांच्या घोषणेनंतर या इच्छुकांना मोठे टेन्शन आले होते. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जुना नोटा बदलून घेणे, सोने खरेदी, ३० टक्के कमिशनच्या बदल्यात नोटा बदलून घेणे, निवडणुकीच्या खर्चाची रक्कम अगोदरच जुन्या नोटांमध्ये अॅडव्हान्स देणे, मंडळे, कार्यकर्ते, बचत गट यांना अगोदर जुन्या नोटांमध्ये पैसे देऊन टाकणे आदी मार्गांनी जुन्या नोटांच्या रोख रकमेची विल्हेवाट इच्छुकांकडून लावण्यात आली.
जुन्या नोटांची विल्हेवाट लावल्यानंतर आता त्यांची बहुतांश रक्कम बँकेत जमा झालेली आहे. बँकेतून आठवड्याला फक्त २४ हजार रुपये रोख स्वरूपात दिले जात आहेत. मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी करावे लागणारे खर्च हे लाखांच्या घरात आहेत. प्रभागातील नागरिकांना देवस्थानांच्या यात्रा घडविणे, मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करणे, संक्रांतीसाठी करावे लागणारे वस्तूंचे वाटप अशा अनेक कारणांसाठी पैशांची आवश्यकता भासत आहे. काही खर्च आॅनलाइन स्वरूपात करता येत आहेत, मात्र सर्व खर्च हा आॅनलाइन पद्धतीने केल्यास आयकर विभागाच्या तो रडारवर येऊ शकतो याची भीती इच्छुकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणुकीवरच्या खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते, या काळात बाजारामध्ये तेजीचे वातावरण असते. मात्र नोटाबंदीमुळे निवडणुका अगदी जवळ आल्या असतानाही बाजारात अजून मंदी जाणवत आहे. (प्रतिनिधी)