शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे हवे नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:32+5:302021-02-07T04:10:32+5:30

सुभाष देसाई : सिम्बायोसिस विद्यापीठ दीक्षांत सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “शैक्षणिक संस्था आणि उद्योग संस्थांचे जवळचे ...

The desired relationship between educational institutions and industries | शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे हवे नाते

शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे हवे नाते

Next

सुभाष देसाई : सिम्बायोसिस विद्यापीठ दीक्षांत सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “शैक्षणिक संस्था आणि उद्योग संस्थांचे जवळचे संबंध असायला हवेत. विद्यार्थ्यांसाठी रोजगार उपलब्धता वाढविणासाठी शिक्षण संस्था आणि उद्योग संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षण देण्याची गरज आहे,” असे मत उद्योग, खाण आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

सिम्बायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात देसाई शनिवारी (दि.६) बोलत होते. फियाट इंडियाचे अध्यक्ष रवी गोगिया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, डॉ. अश्विनी कुमार शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बीबीए रिटेल मॅनेजमेंट, बीबीए लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बीबीए पोर्ट्स आणि टर्मिनल मॅनेजमेंट, बीएससीचे विद्यार्थी ब्यूटी अँड वेलनेस, डायटेटिक्स इन पीजी डिप्लोमा आणि डेटा सायन्स आणि एआयमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रत्येक अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कुलपतींचे सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला.

चौकट

फडणवीस यांनी फक्त स्वप्ने पाहावीत

“शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाआघाडी सरकार मजबूत आहे. या सरकारची वर्षपूर्ती झाली असून पुढील चार वर्षे ते टिकणारच आहे,” असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. सरकार अस्थिर असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फक्त स्वप्नेच पाहावीत.

चौकट

टेस्ला कर्नाटकात नाही

“टेस्ला प्रकल्प कर्नाटकात गेला हा केवळ गैरसमज आहे. असे काहीही घडलेले नाही. ते केवळ शोरूम आणि कार्यालय उघडणार आहेत. मुंबईतही ते अशी कार्यालये उघडणार आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि माझा ‘टेस्ला’शी वार्तालाप चालू आहे. कारखाना कुठे चालू करायचा याचा निर्णय ‘टेस्ला’ने अजून घेतलेला नाही,” असे सुभाष देसाई म्हणाले.

--------

Web Title: The desired relationship between educational institutions and industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.