मूर्तीशास्त्राबाबत समाजात अनास्था : गो. बं. देगलूरकर : ‘चतुरंग’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:04 PM2017-12-18T13:04:43+5:302017-12-18T13:11:32+5:30
चतुरंग संस्थेच्या वतीने सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देगलूरकर यांना पुण्यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे : ‘देवाला इतके हात, तोंड का दिली, याचा अभ्यासच कोणी करीत नाही. त्यामागे काहीतरी विचार आहे. कारण, मूर्तीशास्त्राबाबत खूप अनास्था आहे. ही अनास्था आता समाजाला परवडणार नाही,’ असे प्रतिपादन डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी रविवारी केले.
चतुरंग संस्थेच्या वतीने सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देगलूरकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, वसुंधरा देगलूरकर, सर्जेराव ठोंबरे, डॉ. अरविंद जामखेडकर, डॉ. कविता रेगे, डॉ. शुभदा जोशी, डॉ. सागर देशपांडे उपस्थित होते. पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना देगलूरकर यांनी हा माझा सन्मान नसून मूर्तीशास्त्र व मंदिर स्थापत्याचा सन्मान असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मूर्तीशास्त्र हा विषय खुप दुर्लक्षित, उपेक्षित राहिला आहे. मूर्तीचा अभ्यास करीत असताना मूर्तीची पूजा न करणारा कोणत्याही धर्मातील व्यक्ती आढळला नाही. प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वराचे अव्यक्त रूप असते. या रूपाची उपासना होते, याचा अर्थ मूर्तीचीच पूजा होते.
भारतातील लोक दानवांचीसुद्धा पूजा करतात, असे इंग्रज म्हटले होते. पण, देवांना इतके हात-तोंड का दिली, ही कल्पना त्यांना समजणार नाही. मूर्तीचा अभ्यास करताना मी त्यांच्याशी समरस झालो. त्या माझ्याशी बोलत असतात. ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी परिष्कृत करताना माझे हात पुण्यवान झाले. मूर्तीशास्त्राचे अभ्यासक अनेक आहेत; पण अभ्यास करून मूर्ती परिष्कृत करणारा मीच आहे. आता हे ज्ञान सर्वत्र पसरत आहे. मला अजून खूप अभ्यास करायचा असून, या पुरस्कारामुळे आणखी ऊर्जा मिळाली आहे, अशी भावना देगलूरकर यांनी व्यक्त केली. देगलूरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पाटील यांनी आता नव्या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखवतील, नव्या वाटा शोधतील अशा व्यक्तींचा सन्मान व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुग्धा गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले.