उद्योगासह सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण
By Admin | Published: November 15, 2015 12:39 AM2015-11-15T00:39:25+5:302015-11-15T00:39:25+5:30
देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही,
बारामती : देशात सध्या सर्वच क्षेत्रांत निराशेचे वातावरण आहे. यामध्ये कृषी, अॅटोमोबाईल क्षेत्र देखील अपवाद नाही. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी फारशी चांगली नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्योगक्षेत्राबाबत चिंता व्यक्त केली.
बारामती येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रयत भवन येथे दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांचा मेळावा आयोगित करण्यात आला होता.
पवार म्हणाले, की देशात शेतकरी, व्यापारीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. सरकारची धोरणे पोषक नसल्याने निराशेचे वातावरण झाले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी परदेशी गुंतवणुकीला विरोध केला. मात्र, आता त्यांनीच परदेशी गुंतवणूुकदारांना संधी दिली आहे. यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. याचा परिणाम रिटेल क्षेत्रावर होऊन दुकाने बंद होण्याची भीती आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत सोने, वाहन क्षेत्रात विक्रीमध्ये घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत. गुंतवणुुकीचे प्रमाण वाढविण्यासाठी निर्णय होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारबाबत एका वर्षात निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, एका वर्षात प्रोत्साहन देणारी दिशा दिसत नाही, असेही पवार म्हणाले.
(प्रतिनिधी)