नैराश्यातून मुलाच्या खुनाचा प्रयत्न
By admin | Published: May 3, 2017 02:54 AM2017-05-03T02:54:14+5:302017-05-03T02:54:14+5:30
नैराश्याचा विकार जडलेल्या महिलेने स्वत:च्या मुलाचे कसे होणार, अशा शंकेतून त्याच्या डोक्यात दगडी पाटा घातला आणि स्वत:ही
पुणे : नैराश्याचा विकार जडलेल्या महिलेने स्वत:च्या मुलाचे कसे होणार, अशा शंकेतून त्याच्या डोक्यात दगडी पाटा घातला आणि स्वत:ही पाट्यावर डोके आपटून घेतले. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून अकरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. तो आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन अजित चव्हाण (२१५ , गणपती निवास, गुरुवार पेठ) असे मुलाचे नाव आहे. तो शनिवार पेठेतील शाळेत ५ वीमध्ये शिकतो. त्याचे अभ्यासात काहीसे दुर्लक्ष असल्याचे त्याच्या आईला वाटत होते. त्याचे पुढच्या काळात कसे होणार, या काळजीत ती असते.
त्याच्या आईला दोन महिन्यांपासून नैराश्याचा विकार आहे. सोमवारी सकाळी 8च्या सुमारास या मुलाचे वडील अजित चव्हाण (वय ४२) लहान मुलीसह देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी भ्रमातून रागाच्या भरात या महिलेने मुलाच्या डोक्यात दगडी पाटा घातला. स्वत:ही पाट्यावर डोके आपटले. या मारामुळे हर्षवर्धन जबर जखमी झाला आणि बेशुद्ध झाला. ही महिलाही बेशुद्ध झाली.
अजित चव्हाण घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी हाक मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. हात घालून कडी काढता येत असल्याने त्यांनी दार उघडले, तेव्हा दोघेही जखमी असल्याचे दिसून आले. दोघांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
अजित चव्हाण यांच्या फिर्यादीवरून या महिलेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्हि. डी. केसरकर तपास करत आहेत.
मुलाचे अभ्यासात दुर्लक्ष होत असल्याने चिंतित झालेल्या आईने नैैराश्यातून मुलाच्या खुनाचा प्रयत्न केला.