जामीन मंजूर हाेऊनही ताे सात वर्षे तुरुंगात राहिला; अटीची पूर्तता न करणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 03:13 PM2023-07-25T15:13:39+5:302023-07-25T15:14:32+5:30
थापा याला दरोडा घालण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती....
पुणे : दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतरही ६ वर्षे १० महिने तुरुंगात असलेल्या नेपाळमधील सूरज राकेश थापा याची अखेर तुरुंगातून सुटका झाली. जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत चालविण्यात येत असलेल्या लोक अभिरक्षक कार्यालयाने याबाबत अर्ज केल्यानंतर थापा याला मुक्त करण्यात आले. सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी हा निकाल दिला.
थापा याला दरोडा घालण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्जदेखील केला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र जामिनासाठी ठेवण्यात आलेल्या अटींची पूर्तता थापा याने केली नव्हती. त्यामुळे तो एकूण सहा वर्षे १० महिने आणि १३ दिवस तुरुंगात राहिला. याबाबतची माहिती लोक अभिरक्षक कार्यालयाला समजल्यानंतर थापाच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठीचा अर्ज लोक अभिरक्षक कार्यालयाचे विधीज्ञ ॲड. एन. एच. शेख आणि ॲड. मदन कुऱ्हे यांनी दाखल केला. सुनावणी दरम्यान थापा याने त्याने केलेला गुन्हा कबूल केला. गुन्ह्यासाठी असलेली शिक्षा व थापाने भोगलेली शिक्षा या बाबी लक्षात घेत न्यायलयाने हा निकाल दिला.
"जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोक अभिरक्षक कार्यालयामार्फत उच्च दर्जाची विधी सेवा गरजू व वंचित आरोपींना मोफत दिली जाते. यामुळे जे आरोपी वकील देण्यास सक्षम नाहीत त्यांनाही विधी सेवा पुरवली जाईल."
- सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे.