अंदाज असूनही भागवली आंदोलनाची हौस
By Admin | Published: August 7, 2016 04:29 AM2016-08-07T04:29:46+5:302016-08-07T04:29:46+5:30
पाणीकपात रद्द होणार, याचा अंदाज असूनही त्यासाठी सकाळी आंदोलन करीत राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय
पुणे : पाणीकपात रद्द होणार, याचा अंदाज असूनही त्यासाठी सकाळी आंदोलन करीत राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय जनता पक्ष वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह पालकमंत्री गिरीश बापट यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिय्या देत भाजपा कार्यकर्त्यांना रिकामे हंडे दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडत बैठकीचे ठिकाण असलेल्या कौन्सिल हॉल येथे सकाळपासूनच आंदोलन सुरू केले.
महापौर जगताप, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते शंकर केमसे, शिवसेना गटनेते अशोक हरणावळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, सुशीला नेटके व अन्य नगरसेवकांनी सकाळी १० वाजताच पालकमंत्री बापट यांच्या कसबा पेठेतील संपर्क कार्यालयासमोर टाळ व पाण्याचे रिकामे हंडे वाजवण्यास सुरूवात केली. पुणेकरांचा अंत पाहू नका, रोज पाणी द्या, अडवणूक करू नका, अशा घोषणाही देण्यात येत होत्या. संपर्क कार्यालयात जमा झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना पाण्याचे रिकामे हंडे भेट म्हणून दिल्यावर आंदोलन थांबविण्यात आले.
मनसेने कार्यकर्त्यांसहित सकाळी ११ वाजताच कौन्सिल हॉलच्या बाहेर ठिय्या दिला. प्रल्हाद गवळी, आशिष देवधर, जयराज लांडगे, नरेंद्र तांबोळी आदी कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. बैठक दुपारी ४ नंतर सुरू झाली, तोपर्यंत हे सगळे बसून घोषणा देत होते. नंतर नगरसेवक बाळा शेडगे, राजेंद्र वागसकर, रुपाली पाटील-ठोंबरे, कल्पना जाधव, रवींद्र धंगेकर आदी त्यात सहभागी झाले.