वाकडमध्ये उड्डाणपूल असूनही वाहतुकीचा खोळंबा, हिंजवडीतील कोंडी, बेशिस्त वाहनचालकांमुळे वारंवार अपघाताच्या घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:18 AM2017-09-15T02:18:38+5:302017-09-15T02:20:03+5:30

 Despite the flyover in Wakad, traffic disaster, Hinjewadi stance, unexplained driving, frequent accidents | वाकडमध्ये उड्डाणपूल असूनही वाहतुकीचा खोळंबा, हिंजवडीतील कोंडी, बेशिस्त वाहनचालकांमुळे वारंवार अपघाताच्या घटना  

वाकडमध्ये उड्डाणपूल असूनही वाहतुकीचा खोळंबा, हिंजवडीतील कोंडी, बेशिस्त वाहनचालकांमुळे वारंवार अपघाताच्या घटना  

Next

वाकड : वाकड गावठाणात घुसणारी स्थानिकांची वाहने आयटीकडे जाणाºया वाहनांकडे दुर्लक्ष करतात. एका वाहनचालकाच्या बेशिस्तपणामुळे वाहनांच्या रांगा लागतात. या चौकातून पुढे गेल्यास दहा वर्षांपूर्वी तब्बल पावणेसात कोटी खर्च करून उभारलेला उड्डाणपूल म्हणजे असून अडचण, नसून खोळंबा झाल्याचे चित्र आहे.
दहा वर्षांपूर्वीच्या वाहतुकीचा विचार करून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने या उड्डाणपुलाची उभारणी केली होती. उड्डाणपुलाच्या काही अंतरावर भुयारी मार्गाचे काम झाल्याने पुलावरील ताण कमी झाला आहे. तरीदेखील या उड्डाणपुलाबाबत गोंधळ कायम आहे.
उद्योगनगरीतील मुख्य शिवाजी चौक अत्यंत प्रशस्त आणि भव्य आहे. मात्र, येथे सर्वात जास्त वाहतूककोंडी होते. मुख्य चौकात आडवी -तिडवी उभी करण्यात आलेली वाहने, ऐन रस्त्यावरच बस्तान मांडणारे भाजी व्यावसायिक, पथारी वाले, छोटे व्यावसायिक ठाण मांडून बसले आहेत.
या सर्वांच्या अडथळ्यामुळे येथील वाहतूक रेंगाळत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळते. या चौकात चार रस्ते जुळतात. त्यामानाने केवळ अतिक्रमणाच्या विळख्यामुळेच वाहतूककोंडी होत असल्याचे प्रमुख कारण आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने लावलेल्या नो पार्किंग फलकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. तसेच या चौकात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने वाट्टेल त्या स्टाईलने उभी केली जातात त्यामुळे वाहनचालकांना आयटीत प्रवेश करताना कसरत करावी लागते.
हिंजवडीतील आयटी कंपन्यातून सुटलेले आयटीयन्स देखील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. काही जण नो इंट्रीतून प्रवेश केला की, मेंढरासारखे इतरही त्याच्याच मागे सुसाट वाहने सोडत असल्याने त्यांच्यातील अशिक्षित आणि आडमुठ्या वागणुकीचे चित्र पहायला मिळत आहे. नियम मोडल्याप्रकरणी अनेकदा दंड आकारूनही आयटीयन्स त्यास फारसे जुमानत नाही. कारण त्यांच्या पगाराच्या तुलनेत हा दंड किरकोळ स्वरूपाचा असल्याने ते पोलिसांच्या पावत्यांची फिकीर करत नाही. त्यामुळे या उन्मत्त प्रवृत्तीला आवर घालणार कोण असा प्रश्न आहे.

कारवाईची आवश्यकता : अतिक्रमणांचा त्रास

मुख्य चौकातील अतिक्रमणे युद्घ पातळीवर हटविली पाहिजे, रस्त्यालगतच्या व्यावसायिकांपासून फुटपाथ सोडविला पाहिजे, नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या करण्यात येणाºया वाहनावर प्रखर कारवाई करावी, पर्यायी रस्त्यांची कामे लवकर होणे गरजेचे. यामध्ये वाकड- परिसरातील महापालिकेचे रखडलेले रस्ते लवकरात लवकर मार्गी लावण्याची गरज आहे. सुसू नांदे चांदे मार्ग तयार करून सहा महिन्यांत उखडल्याने तब्बल सहा कोटी पाणयात गेले या रस्त्यावर अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू असते. त्याची सर्व स्तरातून दुरुस्तीची मागणी होत असताना एमआयडीसी त्याकडे कानाडोळा करीत आहे. म्हाळुंगे बालेवाडी मार्गे बाणेरचा रस्ता तातडीने विकसित करणे, मारुंजीवरून पुनावळेकडे कॅनॉलचा रस्ता करणे गरजेचे. व उपलब्ध रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची नितांत गरज आहे.

हप्तेखोरीमुळे वाढतेय अतिक्रमण - श्रीरंग बारणे

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : जागतिक दर्जाचे आयटी पार्क हिंजवडीला मेट्रो रेल्वे यावी, यासाठी मी लोकसभेत वारंवार आवाज उठविला. वाढत्या रहदारी व वाहनसंख्येमुळे रस्ते अपुरे पडत असल्याने हिंजवडीत आयटी हब वसविण्यापूर्वीच राज्य शासनाने येथील रस्त्याचे नियोजन करणे गरजेचे होते, असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेरगाव येथील डांगे चौकात केले.
औंध-रावेत रस्त्यावरील जगताप डेअरी ते डांगे चौक या परिसरात रस्ते प्रशस्त होऊनदेखील दिवसेंदिवस वाहतूककोंडीत भर पडत असल्याने ‘लोकमत’ने डांगे चौकात २२ कोटी रुपये खर्चून दुहेरी पूल उभारूनही वाहतूककोंडी वाढत असल्याचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची गंभीर दखल खासदार बारणे यांनी घेत वाहतूक पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाºयांसमवेत डांगे चौक आणि जगताप डेअरी या चौकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. त्या वेळी सह आयुक्त राजेंद्र भांबरे, सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंते झुंजारे, हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील, गजानन चिंचवडे, नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले, नीलेश बारणे, उपअभियंता ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते. खासदार बारणे म्हणाले, ‘‘हफ्तेखोरीमुळे चौका-चौकांत अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.
या सर्वांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी हिंजवडी-म्हाळुंगे आणि हिंजवडी-पुनावळे हे रस्ते लवकरात लवकर विकसित केले पाहिजेत. या चौकातील वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणारे अतिक्रमण आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका आणि वाहतूक पोलीस अधिकाºयांना केल्या. यावर आठवडाभरात या सर्वांवर कारवाई करून रस्ता व चौक वाहतुकीसाठी खुले करणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

Web Title:  Despite the flyover in Wakad, traffic disaster, Hinjewadi stance, unexplained driving, frequent accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे