बहुमत असूनही राममंदिर उभारणीस विलंब का? उद्धव ठाकरे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 01:47 AM2018-11-23T01:47:09+5:302018-11-23T01:47:27+5:30
पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे.
जुन्नर (जि. पुणे) : पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांचे मिलीजुली सरकार होते. आता केंद्रात पूर्ण बहुमताचे सरकार आहे. मग, राममंदिर उभारणीस विलंब का, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राममंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची आम्हाला सवय नाही. मला काही जणांची भंडाफोड करायची आहे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना पक्षनेते उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या येथे रामजन्मभूमीत दर्शनासाठी जात आहेत. अयोध्या येथे राममंदिरासाठी होणाऱ्या कार्यक्रमासाठी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवरून गुरुवारी मंगल कलश नेण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवरील पवित्र माती व जल याच्या मंगल कलशाचे पूजन करण्यात आले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिर, हिंदुत्व याविषयांवर कोणतेही गट-तट असू नयेत. आमचं हृदय आणि मन भगवं आहे. किल्ले शिवनेरीची माती पवित्र माती आहे. या मातीमध्ये चमत्कार करणारी ताकद आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवजन्मस्थळ, शिवकुंज स्मारक येथे बालशिवबा राजमाता जिजाऊ यांच्या शिल्पास अभिवादन केले. यानंतर पदाधिकारी व शिवसैनिकांनी चांदीच्या कलशामध्ये पवित्र माती व जल भरून हा
कलश उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला.