शंभर तक्रारी करूनही बावधन कचरामुक्त होईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:47+5:302021-03-06T04:10:47+5:30
पुणे : बावधान परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यांच्या कडेला कचराच कचरा दिसून येत ...
पुणे : बावधान परिसरात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात कचरा टाकला जात आहे. रस्त्यांच्या कडेला कचराच कचरा दिसून येत आहे. याबाबत बावधन सिटीझन फोरम तर्फे शंभरहून अधिक तक्रारी महापालिकेकडे आणि संबंधित विभागात केल्या आहेत. परंतु, ही समस्या अद्यापही सुटलेली नाही. फोरमचे सदस्य सतत या समस्येवर आवाज उठवत आहेत. पण महापालिकेकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही.
अनेक हॅाटेलचालक, नागरिक कचऱ्याच्या पिशव्या कुठेही टाकून देत आहेत. बावधन येथून जाणाऱ्या हायवेच्या कडेला तर प्रचंड प्रमाणात कचरा दिसून येतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या कोरोनामुळे सर्वजण हैैराण झाले आहेत. त्यात या कचऱ्याची समस्या आणखी भर टाकत आहे. त्यामुळे या समस्येवर त्वरित तोडगा काढून बावधन कचरामुक्त करण्याची मागणी होत आहे.
कोरोनामुळे सर्व नागरिक घाबरलेले आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधीत वाढ होत आहे. त्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. एकीकडे पुणे राहण्यायोग्य शहर म्हणून देशात दुसऱ्या क्रमांकावर येते आणि दुसरीकडे शहरात कचरामुक्तीसाठी नागरिकांना आवाज उठवावा लागतो. हे अतिशय वाईट आहे. महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करून नागरिकांना योग्य सुविधा द्यायला हव्यात. तरच हे शहर राहण्यायोग्य ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
-------------------------
बावधन परिसरात प्रचंड कचरा साठला आहे. आम्हाला कचरामुक्त बावधन हवा आहे. महापालिकेकडे कितीदा तक्रारी दिल्या, पण त्यावर काहीच पावले उचलली जात नाहीत. महापालिका यंत्रणा सक्षमपणे काम करणारी हवी.
- मनीष देव, सदस्य, बावधन सिटीझन फोरम
------------------