महिना होऊनही बोर्डाकडून कोणतीच पूर्तता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:31+5:302021-07-18T04:08:31+5:30
लष्कर : पुणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. त्याचा अहवाल देखील ...
लष्कर : पुणे महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. त्याचा अहवाल देखील कॅन्टोन्मेंट बोर्डाला गेल्या महिन्यात (४ जून) दिला होता. ज्यात अनेक चुका, त्रुटी आढळल्या होत्या. त्यावर बोर्डाने त्वरित उपाययोजना करून त्या सुधाराव्यात असे नमूद केले होते. परंतु महिना होऊनही बोर्डाने कुठल्याच बाबींची योग्य ती पूर्तता केली नसल्याचे समोर आले आहे.
राज्यातील काही रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटना तसेच पुण्यातील फॅशन मार्केटला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी पुण्यातील सर्व हॉस्पिटल व इतर सरकारी वा खासगी अास्थापनांचे त्वरित फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सरदार पटेल शासकीय रुग्णालयचे ऑडिट करण्यात आले होते, त्यात अनेक धक्कादायक त्रुटी अग्निशमन विभागाला आढळून आल्या होत्या. त्या त्रुटी त्वरित प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असा शेरा अग्निशमन अधिकाऱ्याने फायर ऑडिटमध्ये दिला होता. परंतु महिना उलटूनही या त्रुटी दूर करण्यात आल्या नाहीत.
पटेल रुग्णालयाबरोबरच, कोविड चेस्ट रुग्णालय नवा मोदीखाना, युनानी रुग्णालय धोबीघाट, राममंगल हार्ट केअर ॲण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट फातिमानगर आदी रुग्णालयाचे देखील फायर ऑडिट केले असून त्यामध्येही ताशेरे मारल्याचे समजते. परंतु बोर्डाच्या हद्दीतील इतर रुग्णालय, व अास्थापनांचा फायर ऑडिटच काय?????? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
पटेल रुग्णालयाच्या फायर ऑडिटमधील निरीक्षणे-
१)रुग्णालयाकडे फायर एनओसी नाही
२)कुठलीही नोंदणीकृत फायर फायटिंग एजन्सी नाही
३)फॉर्म-ब चे सर्टिफिकेट नाही
४)नियमाने २ एलपीजी सिलेंडर कॅन्टिनमध्ये असावेत परंतु १२ एलपीजी सिलिंडर आढळतात.
५) फायर फायटिंग सिस्टम नाही
६) दर सहा महिन्याला मॉक ड्रिल होत नाही
७) संपूर्ण रुग्णालयातील विद्युत जोड वायरिंग खराब फायर ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटींची व सुचवलेल्या उपाययोजनांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे, याबाबत अधिक माहिती घेऊन बोलतो.
अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी.
बोर्डाचा कारभार अगोदरपासूनच ढिसाळच आहे. येथील अधिकारी आणि प्रशासनाला नागरिकांच्या समस्या, आरोग्य बाबत काहीही देणंघेणं नाही याचा अनुभव फार पूर्वीपासून आहे. रुग्णालयाबरोबरच येथील इमारती, शाळा आणि इतर आस्थापने याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करते.
राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ कार्यकर्ते, कॅन्टोन्मेंट बोर्ड अभ्यासक
१७ लष्कर