दडपशाहीला न जुमानता आंदोलन करणारच - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:05 PM2018-07-15T17:05:33+5:302018-07-15T17:56:25+5:30
राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे.
पुणे : राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. तसेच राज्य शासनाने संघटनेच्या कार्यकर्त्यांची कितीही धरपकड केली तरी या दडपशाहीला न जुमानता दुधाला प्रति लिटर पाच रुपये दरवाढ किंवा तेवढे अनुदान शेतक-यांच्या खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता शेट्टी यांनी आंदोलनाबाबत आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, तीन रुपये दरवाढीचा प्रस्ताव देणारे दूध भुकटीच्या कंपनीचे मालक आहेत. त्यांनीच दुधाचा भाव पाडला आहे. कमी भाव त्यांच्याकडूनच मिळत आहे. केंद्राने वेळेवर निर्णय न घेतल्याने भुकटीचे भाव पडले. आता सरकारनेच दूध भुकटी निर्मितीसाठी प्रतिलीटर तीन रुपये तर निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णयही झाला आहे. त्यांना अजूनही काही फायदे मिळण्याची शक्यता असून दुधाला प्रतिलिटरमागे १२ रुपये वाढ होऊ शकते. असे असताना उत्पादकांना केवळ तीन रुपये वाढ देतात. ही उत्पादकांची फसवणुक आहे. जे दूध भुकटी करत नाहीत, त्यांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दरवाढ होणार नाही. त्यासाठी सरकारनेच प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे किंवा सरसकट पाच रुपये दरवाढ द्यावी. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.
दूध उत्पादकांना प्रति लिटर ३० ते ३५ रुपये उत्पादन खर्च येतो. पण दुधाला निम्मीच किंमत मिळते. जो व्यवसाय परवडत नाही तो करायचा नाही, अशी भूमिका आहे. त्यामुळे दूध विक्री न करण्याचा निर्णय दूध उत्पादकांनी घेतला आहे. आंदोलनाचा निर्णय संघटनेचा नसून राज्यभरातील उत्पादकांशी चर्चा करूनच घेतला आहे. दूध विकायचे की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना कोणीही रोखु शकत नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
तर कायदा हातात घेऊ...
शेतकऱ्यांना दूध देण्याची सक्ती केल्यास संघटनेकडून कायदा हातात घेऊन संरक्षण दिले जाईल. संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देऊन, धरपकड करून आंदोलन दडपले जाणार नाही. ते अधिक तीव्र होईल. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कायदा आपले काम करेल, असे म्हटले असले तरी त्यांना शेतकरी कसा प्रतिकार करतात ते रात्री बारानंतर कळेल, असे आव्हान राजू शेट्टी यांनी दिले.