हरिश्चंद्री येथे वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:22+5:302021-01-10T04:08:22+5:30
पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. ...
पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावाच्या हद्दीत मागील दोन महिन्यांत दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. तर, गाड्यांचे अपघात वारंवार घडतात. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. याबाबत वारंवार मागणी करून आंदोलन करूनही महामार्ग प्राधिकरण रस्ता भुयारी मार्ग करत ना उड्डाणपूल यामुळे संतप्त ग्रामस्थ महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत. पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री गावातील लोकांची शेतजमीन महामार्गाच्या पलीकडे आहे.त्यामुळे रस्ता ओलांडुन जावे लागतो.भरधाव वेगाने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडतात यामुळे महामार्गावर भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल करावा म्हणून हरिश्चंद्री ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली, निवेदने दिली. आंदोलन केले. मात्र अद्याप ना पूल झाला ना भुयारीमार्ग झाला. याशिवाय येथील सर्व्हिस रस्ताही अपूर्ण आहे.यामुळे अपघात घडतात.
मागील महिन्यात रस्ता ओलांडताना एकाच, तर दोन दिवसांपूर्वी किसन बदक हे कापूरव्होळ येथून गावी जात होते. या वेळी मागून आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली, यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. येथील रस्ता धोकादायक असून हरिचंद्र येथे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. यामुळे या मार्गावर सतत अपघात होत आहेत. किसन बदक यांच्या मृत्यूला महामार्ग प्राधिकरण जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केला. राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी काल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.मात्र तातपुरती कारवाई केली जाते ठोस मार्ग काढला जात नाही,त्यामुळे पुन्हा पुन्हा अपघात घडतात.
अपघातामुळे हरिचंद्र गावातील मंदिरात महामार्ग प्राधिकरण रिलायन्सचे पदाधिकारी यांच्यात बैठकीचे आयोजन केले होते, यामध्ये येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवा रस्त्याचे काम २० दिवसांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीला सरपंच संध्या गाडे, सदस्य जालिंदर गाडे, शरद गाडे व राम पाचकाळे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ महामार्ग प्राधिकरणाचे अनिल गोरड रिलायन्सचे बी.डी कोळी आदी उपस्थित होते. या वेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही.
भुयारी मार्गाची मागणी
ग्रामस्थांना गावात ये-जा करण्यासाठी हरिष्चंद्री येथे भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून येथील ग्रामस्थ करीत आहेत. त्यासाठी जून १९ मध्ये तहसील कार्यालयासमोर उपोषणही करण्यात आले होते. तसेच, गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी सदस्य अपघातास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते, मात्र प्रशासनाकडून त्यांच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत आहे, यामुळे ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत.
चौकट मागिल १५ वर्षापासून महामार्गाची कामे अपूर्ण पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील वर्वे-सारोळे- नसरापूर येथील पूल अपूर्ण आहेत. भोर फाट्यावरील पुलाची उंची कमी आहे. नारायणपूर फाटा येथे व हरिश्चंद्री येथे उड्डाणपूल नाही, सेवा रस्ते अपुर्ण मोठमोठे खडडे यामुळे मागिल १५ वर्षात अनेकांचे जीव गेले तर कित्येक जणांना अपंगत्व आले आहे.माञ तरीही महामार्ग प्रधिकाराचे दुर्लक्ष होत आहे.माञ टोल वसुली जोरात सुरु असल्यामुळे प्रवासी नागरिक नाराजी व्यक्त करित आहेत, त्यामुळे प्रधिकरणाने लक्ष देण्याची गरज असल्याचे राम पाचकाळे यांनी सांगितले.
पुणे सातारा महामार्गावर हरिश्चंद्री ता भोर येथे गाडयांची धडक होऊन अपघात फोटो