पाणी योजनेसाठी ४७ लाख खर्चूनही गाव तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:47+5:302021-08-22T04:13:47+5:30
सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात ...
सन २०१४-१५ या वर्षांत दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची राष्ट्रीय पेयजल योजनेतून धामणी गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. यासाठी ग्रामस्थांनी चोवीस लाख रुपये लोकवर्गणी जमा केली होती. मात्र, ठेकेदार व अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन महिने सुद्धा धामणी गावाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. याची चौकशी करून अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि गावाला पाणीपुरवठा करावा यासाठी जिल्हा परिषद पुणे येथे बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सागर जाधव यांनी दिली.
पावसाने दडी मारल्याने आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागावर दुष्काळाचे सावट आहे. धामणी गाव व परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवत आहे. धामणी गावासाठी तब्बल २ कोटी ४७ लक्ष रुपयांची योजना पूर्ण होऊन काही अडचणींमुळे बंद आहे. या योजनेमध्ये अनेक ठिकाणी गळती, एअर वॉल गळती, पाण्याच्या टाक्या मधून गळती, मोटर पंप स्टार्टर बंद पडतो, पाण्याची टाकीवरील शिडी नादुरुस्त आणि अनेक ठिकाणी नळ योजना पाईप जोडणे बाकी आहे. विहिरीवरील दोन्ही मोटारी नादुरुस्त आहे. अशा अनेक गोष्टीमुळे ही योजना चालू नाही.
हे काम ८ दिवसांत नाही झाले, तर ग्रामपंचायत धामणी व ग्रामस्थांच्या वतीने येत्या बुधवारी २५ रोजी जि. प. पुणे येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. त्या संदर्भात निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयाला व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेंडगे यांच्याकडे देण्यात आले. त्या वेळी या समस्येतून मार्ग काढण्याचे आश्वासन शेंडगे यांनी दिले. यावेळेस पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ॲड. विठ्ठल जाधव पाटील, खडकवाडी गावचे माजी सरपंच अनिल डोके, सरपंच सागर जाधव हे उपस्थित होते.
--
चौकट
धामणी परिसर दुष्काळग्रस्त भाग असून, या परिसरात ऐन पावसाळ्यात देखील टँकर चालू आहे. टॅंकरव्दारे येणारे पाणी पुरत नाही. दोन कोटी ४७ लाख रुपये किमतीची पाणीपुरवठा योजना पूर्ण असूनही काही कारणास्तव ती बंद असल्या कारणाने धामणी गाव पाण्यावाचून वंचित राहत आहे. मागील पाच वर्षांपासून धामणी गावात टँकर चालू आहे. ही योजना व्यवस्थित चालू झाली असती तर गावाला योग्य पद्धतीने पाणीपुरवठा होऊन टँकरसाठी वापरलेले शासनाचे लाखो रुपये वाचले असते. प्रशासकीय अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने धामणी गावाला टँकरची आवश्यकता लागली आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.