जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 01:43 PM2024-07-07T13:43:43+5:302024-07-07T13:44:08+5:30
वर्षाविहाराला निघालेले पर्यटक अनेकदा धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट करतात, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतोय
पुणे : भुशी धरणाच्या जवळील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गड, धरणे, धबधबे या ठिकाणी १४४ कलम म्हणजेच जमावबंदी लागू केली. परंतु, शनिवारी (दि. ६) किल्ले सिंहगडावर मात्र हजारो पर्यटक पाहायला मिळाले. त्यामुळे जमावबंदीची अंमलबजावणीच दिसून आली नाही. दरम्यान, गडावर जमावबंदी लावताच कशाला? असा सवालही पर्यटकांनी आणि विक्रेत्यांनी उपस्थित केला.
वर्षाविहाराला निघालेले पर्यटक अनेकदा धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट करतात. त्याचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर टाकतात. परंतु यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशा अनेक घटना काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धरण, धबधबे, तलाव, गडकिल्ले यावर जमावबंदीचे आदेश दिले आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. भुशी डॅम आणि प्लस व्हॅलीतील दोन दुर्घटनेनंतर हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
सध्या पावसाळा असल्याने अनेक जण पर्यटनासाठी शनिवार-रविवारी घराबाहेर पडतात. परंतु, धोकादायक ठिकाणी अपघात घडल्याने आता पर्यटकांना घराबाहेर जायचे की नाही? अशी चिंता लागली आहे; पण काही पर्यटक मात्र बिनधास्त फिरायला जात आहेत. शनिवारी सिंहगड किल्ल्यावर हेच चित्र पाहायला मिळाले. काही प्रमाणात पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे चित्र होते. परंतु साधारणपणे ५ हजार पर्यटक आल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी व तेथील जाणकारांनी सांगितले. तसेच गडावर गेल्यानंतर सर्वत्र गर्दी दिसून आली. त्यावरून जमावबंदीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी वनविभागाच्यावतीने कोणीही नव्हते. गडाच्या पायथ्याला वाहने सोडताना चारचाकीमध्ये पाच ते आठ जण असले तरी त्यांना वरती सोडण्यात येत होते. केवळ त्यांच्याकडून उपद्रव शुल्क १०० रुपये घेतले जात होते. त्यामुळे त्या ठिकाणी देखील या आदेशाबाबत काहीच पाळले जात नव्हते.
गडावरील किंवा इतर पर्यटनस्थळावरील अपघात टाळण्यासाठी आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत. परंतु, तशी काहीच व्यवस्था गडावर पाहायला मिळाली नाही. अनेक जण चारचाकीमध्ये आठ-आठ जण येऊन गडावर फिरत होते. गडावरील परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता.
धोकादायक ठिकाणी फोटोसेशन सुरूच
वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील गडावर अनेक धोकादायक ठिकाणी पर्यटक लहान मुलांसह सेल्फी आणि फोटो काढत होते.
खडकवासला चौपाटीवरही गर्दी
धरणांवरदेखील १४४ कलम लागू आहे; पण खडकवासला चौपाटीलादेखील गर्दी होती. काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी धरणाच्या बाजूने बांबू लावले आहेत. तसेच खडकवासला पाण्यात उतरण्यावरही बंदी घातलेली आहे. त्या ठिकाणी काही सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यामुळे पाण्यामध्ये कोणीही उतरत नव्हते, ही चांगली गोष्ट पाहायला मिळाली.
गडावर जमावबंदी कशाला?
गडकिल्ले हे आपली प्रेरणादायी ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी १४४ कलम लावण्याची गरजच काय होती? असा सवाल त्या ठिकाणी पर्यटक आणि विक्रेत्यांनी उपस्थित केला. कारण, गडावर येऊन पर्यटक कोणताही दंगा किंवा इतर गैरप्रकार करत नाहीत, त्यामुळे गडकिल्ल्यांसाठी हे कलम लावणे चुकीचे असल्याचे म्हणणे पर्यटक आणि विक्रेत्यांचे होते.