मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:47 IST2025-01-16T19:46:50+5:302025-01-16T19:47:24+5:30
एकीकडे पिंपरी - चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी खर्चून प्रकल्प उभे केले असतानाही सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी इंद्रायणीत सोडले जाते

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच; रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात
आळंदी : पिंपरी - चिंचवड पालिका हद्द तसेच इंद्रायणी नदीकाठच्या विविध गावांतून मैलामिश्रित व रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडत असल्याने रासायनिक पाण्याने इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात फेसाळलेली दिसून येत आहे. आळंदी येथील जुन्या बंधाऱ्याचे काही दरवाजे उघडे असल्याने तेथून हिरव्या व पिवळसर रंगाचे मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी नदीपात्रात पडत असल्याचे चित्र गुरुवारी (दि. १६) दिसून आले. विशेषतः पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात रासायनिक फेस वाहत आहे. त्यामुळे पवित्र इंद्रायणीची समस्या काही पाठ सोडत नसल्याची सत्यस्थिती आहे.
मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायन मिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे.
इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दुरगामी परिणाम होत आहे. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. इंद्रायणी नदीपात्रात जलप्रदूषण होऊ नये यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मैलामिश्रित रासायनयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे गरजेचे आहे, अशी मागणी आळंदीकर नागरिक व भाविक करत आहेत.
मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन....
पवित्र इंद्रायणीला प्रदूषणाचे लागलेले ग्रहण दूर करण्याच्या वल्गना अनेक राजकीय नेते आळंदीत आल्यानंतर करत आहेत. मात्र यावर ठोस उपाययोजना कार्यान्वित केली जात नाही. मागील पंधरा दिवसांपूर्वी आळंदीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंद्रायणीचे प्रदूषण थांबविण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
कोट्यवधी रुपये रुपये खर्चून उभारलेले प्रकल्प काय कामाचे?
एकीकडे पिंपरी - चिंचवड शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे केले आहेत. उभारलेले प्रकल्प चालवण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तरीदेखील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते पाणी तसेच नदीत सोडले जात असल्याने नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आळंदी शहरातील नागरिकांना हेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.