आश्चर्य ! जिल्ह्यात मिठाईचोरच जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:28 AM2017-07-28T06:28:31+5:302017-07-28T06:28:34+5:30
राज्यभरात पेट्रोलपंपावरील अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने केलेल्या इंधनचोरीच्या घटना उघड होत आहेत. पुण्यात मात्र, पेट्रोलचोरांपेक्षा मिठाईचोर दुकानदार जास्त असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे
विशाल शिर्के
पुणे : राज्यभरात पेट्रोलपंपावरील अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने केलेल्या इंधनचोरीच्या घटना उघड होत आहेत. पुण्यात मात्र, पेट्रोलचोरांपेक्षा मिठाईचोर दुकानदार जास्त असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. मापात पाप करणे, छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला पॅकबंद मिठाई विकण्यात स्वीट शॉप्स आघाडीवर असल्याचे अहवाल सांगतो.
वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने जवळपास ४० विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्य पदार्थांच्या वजन मापांची वैधता तपासली जाते. अगदी वजन-काट्याच्या मापात कोण फेरफार करीत नाही ना?, छापील किमतीपेक्षा कोणी अधिक किमतीने माल विकत नाही ना? हेदेखील पाहिले जाते. त्यासाठी अचानकपणे तपासणी करण्याचे अधिकारदेखील या विभागाला आहेत.
पेट्रोलपंप, केरोसिन विक्रेते, एलपीजी गॅस, सिनेमागृहातील विक्रेते, सिमेंट, स्टील, राईस मिल, मिठाईवाले, फळ-भाजी विक्रेते अशा
वजनाशी आणि वैध किमतीशी संबंधातील सर्व पदार्थांचा व्यवहार ‘वैध’ मार्गाने चालतो की नाही, हे पाहण्याचे काम या विभागाच्या माध्यमातून केले जाते.
या विभागाने मार्च २०१६ पर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. त्या नुसार २०१२ ते २०१६ या कालावधीत ५० स्वीट शॉप्समध्ये मिठाईच्या मापात पाप केल्याची कारवाई वैधमापन विभागाने केली असून, १२० जणांना मापे प्रमाणित करुन न घेतल्याने कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तर, ७९ प्रकरणांत पाकिटावरील छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याने कारवाई करण्यात आली आहे. तर, पाकीटबंद वस्तूंच्या नियमांचे भंग केल्याप्रकरणी २२३ जणांवर कारवाई झाली आहे. या प्रकरणी या व्यावसायिकांकडून तब्बल १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वजनात घट, पाकीटबंद वस्तूंची अधिक दराने विक्री आणि वजनमापे प्रमाणित नसणे अशा सर्वच प्रकारात स्वीट शॉप्स आघाडीवर असल्याचे अहवाल सांगतो. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती उघड केली आहे.