नियतीनेही त्यांचं अतूट प्रेम मान्य केलं! पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एक तासानंतर पतीनेही घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:08 PM2021-03-27T22:08:32+5:302021-03-27T22:11:33+5:30
कांताबाई यांच्यासाठी त्यांचे पती हे सर्वस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक सुख दुःखात त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या.
पुणे: आयुष्यभरासाठी जर पती आणि पत्नी म्हणून सोबत प्रवास करायचा 'पण' केला असेेेल तर मग नात्यात प्रेम, जिव्हाळा पेरावाच लागतो. कष्ट, संघर्ष, मेहनत यांनी संकटांशी झुंजावंच लागते. हे सारं जमलं की, एकमेकांच्या श्वासांची देखील दिलजमाई होऊन जाते. अशाच एका पुण्यातील जोडप्याने अवघ्या एका तासांच्या अवधीने जगाचा निरोप घेतला.
खडकवासला परिसरात राहणाऱ्या दिनकर पांडुरंग दणाणे (वय ७५) आणि कांताबाई दिनकर दणाणे (वय ६९) असे निधन झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. अतिशय साधी राहणीमान, मनमिळाऊ, बोलका स्वभाव यामुळे असलेल्या या जोडप्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथून १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत कामाच्या शोधत ह्या जोडप्याने पुणे गाठले अन् ते कायमचेच पुणेकर झाले.
कांताबाई यांच्यासाठी त्यांचे पती हे सर्वस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक संकटात आणि निर्णयावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पतीच्या आजारपणात देखील त्यांनी पूर्ण काळजी घेतली. अत्यवस्थ झालेल्या पतीच्या अगोदर कांताबाई यांनी मृत्यूला कवटाळले आणि आयुष्यभर एकजीवाने राहीलेल्या पती-पत्नीने अंतिम प्रवासही सोबतच केला.
दिनकर दणाणे यांना केंद्रीय जल विद्युत संशोधन केंद्रात कामाला होते. त्यांनी दोन मुले आणि एका मुलीचे आयुष्य घडवले.
केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रामधून २००६ साली सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या दिनकर यांना अगोदर मधुमेह होता. त्यानंतर त्यांची किडनी आणि लिव्हर निकामी झाले. २५ मार्च रोजी डॉक्टरांनी दणाणे यांची मुले आणि पत्नी यांना सांगितले की, ते चोवीस तासांपेक्षा जास्त काळ जगणार नाहीत. डॉक्टरांचे शब्द ऐकून कांताबाई व्यथित झाल्या. मुलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु २५ मार्चला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कांताबाई यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत दिनकर दणाणे यांनीही प्राण सोडला.