गोडावूनच्या आगीत ६० लाख रुपयांचा किराणा माल खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:15+5:302021-03-30T04:08:15+5:30
मंगळवारी (दि. २३) मध्यरात्री यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना यवत उंडवडी रस्त्यालगत गराडेवस्तीजवळ असलेल्या गोडावूनमधून धूर निघत ...
मंगळवारी (दि. २३) मध्यरात्री यवत पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना यवत उंडवडी रस्त्यालगत गराडेवस्तीजवळ असलेल्या गोडावूनमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती देऊन गोडावूनचे मालक आरीफ तांबोळी यांना तेथे बोलाविण्यात आले.
मात्र, तोपर्यंत आग भडकली होती. सरपंच समीर दोरगे व आजूबाजूच्या नागरिकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नव्हती. या वेळी पोलीस कर्मचारी देखील तेथे उपस्थित होते. काही वेळात दौंड नगर परिषद व कुरकुंभ औद्योगिक वसाहतमधील अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून गोडावूनच्या बाजूला असलेल्या घरातील लोकांना बाहेर काढण्यात आले होते. त्याचबरोबर आजूबाजूच्या घरांमधील गॅस सिलेंडर देखील बाहेर काढण्यात आले होते.
पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या. त्याअगोदर गोडावूनचे मोठे शटर जेसीबी मशीनच्या साहाय्याने तोडण्यात आले. या वेळी आगीचे मोठे लोळ बाहेर येत होते. गोडावूनमध्ये खाद्यतेलाचा साठा असल्याने आग आणखीनच वाढत होती. याचबरोबर खाद्यतेल समोरच्या रस्त्यावर वाहत येऊन पेट घेत होते. अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्यांनी पहाटे साडेपाच वाजता आगीवर नियंत्रण मिळविले.
५० ते ६० लाखांचा किराणा माल जळून खाक
पहाटे आग आटोक्यात आली, पण तोपर्यंत गोडावूनमधील आटा, बेसन, मसाले, लज्जत पापड, रवा व खाद्य तेलाचा साठा जळून खाक झाला. गोडावूनमध्ये असलेली खरेदी विक्री बिले, महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली. आगीत सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आरिफ तांबोळी यांनी यवत पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत दिली आहे.
यवत येथे किराणा मालाचे गोडावूनला लागलेल्या आगीत संपूर्ण गोडावूनमधील माल जळून खाक झाला.