प्रदूषणामुळे माशांचे अस्तित्व नष्ट, मुळा नदी स्वच्छता अभियानातर्फे पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:20 AM2018-02-06T01:20:56+5:302018-02-06T01:21:02+5:30
मुळा नदी प्रदूषणात वाढ झाल्याने माशांचे अनेक प्रकार सध्या आढळत नसल्याची धक्कादायक बाब परिसरातील मुळा नदी स्वच्छता अभियानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाली आहे.
बाणेर : मुळा नदी प्रदूषणात वाढ झाल्याने माशांचे अनेक प्रकार सध्या आढळत नसल्याची धक्कादायक बाब परिसरातील मुळा नदी स्वच्छता अभियानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे अनेक माशांचे अस्तित्व नष्ट झाल्याचे दिसून येत आहे.
प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाणही कमी झाले आहे. मुळा नदीपात्रात बाणेर एसटीपी प्लॅन्टजवळ; तसेच औंध स्पायसर पुलाजवळ नदीपात्रामध्ये थेट
मैलापाणी सोडण्यात येत आहे. नदीपात्रात थेट मैलापाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. प्रदूषणाची वाढ होत असल्यामुळे जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
>मुळा नदी स्वच्छता अभियान अंतर्गत पाण्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये नदी प्रदूषणात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण चिंताजनक रितीने कमी होत आहे. प्रदूषणात वाढ झाल्यास नदी मृत होईल, यासाठी सक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत.
- शैलजा देशपांडे
नदी स्वच्छता अभियानचे कार्यकर्ते
>मासेमारीवर मोठा परिणाम
आठ ते दहा वर्षांपूर्वी औंध परिसरात नदीपात्रामध्ये २० ते २४ प्रकारचे मासे सापडत होते. औंध परिसरातील कोळी समाजातील अनेक नागरिक या परिसरात मासेमारीचा व्यवसाय करत होते.
सध्या केवळ दोन प्रकारचे मासे आढळतात. प्रदूषणामुळे मासेमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न,
नदीपात्रातील प्रदूषण वाढल्याने अनेक समस्या वाढल्या आहेत.
नदीपात्रालगत कचरा टाकण्यात येत आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, तर प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णीची समस्यादेखील निर्माण होत आहे. जलपर्णी वारंवार वाढत असल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे.
जैवविविधतेला धोका-मुळानदी पात्रालगत अनेक पक्षी, प्राणी पाहायला मिळत होते. नदीमध्ये मासे पकडण्यासाठी येणाºया पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे.
>नदीपात्रात मैैलापाणी
नदीपात्रालगत पूर्वी आढळणारे अनेक जीव शहरीकरण व प्रदूषणामुळे दुर्मिळ झाले आहेत. औंधलगत असलेल्या संरक्षण खात्याच्या जागेत प्रदूषण तुलनेने कमी आहेत.
या परिसरात काही प्रमाणात जैवविविधता पाहायाला मिळत आहे. परंतु, शहरीकरण झालेल्या भागात जैवविविधतेचे प्रमाण कमी होत आहे.
मैलापाणी थेट नदीपात्रात- बाणेर एसटीपी प्लॅन्टजवळ मुळा नदीपात्रात अनेकदा सकाळी सात ते दहा दरम्यान लाखो लिटर मैलापाणी सोडण्यात येते.
औंध परिसरात फुटलेल्या मैलापाणी वाहिन्यांतून दूषित पाणी नदीपात्रात जाते. यामुळे पात्रातील पाण्याचे प्रदूषण वाढले आहे.
>हे मासे गायब
अंबळ्या, चिंगळी, डाक्या, रऊ, शिंगाड्या, लोळ्या, आमळ्या, वाम, मरळ, रावस, कटला, पोपट, तांबिरे, कोळस, वालेंजी, सुरळी, सिंगीं, चालट, मांगुर इत्यादी मासे या नदीपात्रातून गायब झाले आहेत.
>मुळा नदी पात्राच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक शनिवारी स्वच्छता अभियान राबवण्यात येते. नदीपात्रात थेट मैलापाणी सोडण्यात येत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. यामुळे नदीची जैवविविधता धोक्यात आली आहे. यावर योग्य उपायोजना करणे आवश्यक आहे.
- गणेश कलापुरे, नदी स्वच्छता अभियानचे कार्यकर्ते