‘रिमोट’कंट्रोलने केला घात!; नीरा भीमा दुर्घटनेतील कामागारांचे मृतदेह पाठविले गावाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 04:10 PM2017-11-21T16:10:58+5:302017-11-21T16:20:32+5:30
नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या दुर्घटनेत आठजण मृत्युमुखी पडले असून ही घटना क्रेनचा वायरोप कंट्रोल करणाऱ्या रिमोटमध्ये बिघाड झाल्याने घडला असल्याची माहिती मिळाली आहे.
विजय गायकवाड
अकोले : वेळ ५ वाजून ४० मिनिटे...२०० फूट खोली वरील बोगद्यातील ड्रीलिंगचे काम आटोपून घरी निघण्याची घाई...दिवसभर काम केल्याचे समाधान चेहऱ्यावर घेऊन वरून बकेट कधी खाली येणार याची वाट पाहत आठ जण वर निघण्याच्या तयारीत होते. बकेट खाली आले आणि आठजण त्यात बसले...बकेटचा वायरोपवर खेचत खेचत जमिनीवर घेऊन जाण्यासाठी सुरू झाला.. मात्र नियतीने या आठ जणांना त्यांच्या जीवनाचा अंत जवळ आल्याची जराही कुणकुण नव्हती. चार ते तीन मिनिटातच बकेट वर आले आणि आठजणांना जमिनीवर सोडण्याऐवजी देवाघरी नेले.
नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाच्या दुर्घटनेत आठजण मृत्युमुखी पडले असून ही घटना क्रेनचा वायरोप कंट्रोल करणाऱ्या रिमोटमध्ये बिघाड झाल्याने घडली असल्याची माहिती मिळाली आहे. बोगद्यातून दोनशे फुटावरून निघालेला माल आणि कामगार खाली-वर नेण्यासाठी क्रेनच्या दोन बकेटचा वापर करण्यात येत होता. हे बकेट रिमोटच्या साह्याने कंट्रोल करण्यासाठी खाली आणि वरती एका सुपरवायझरची नेमणूक केली होती. मात्र संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोगद्यातून काम आटोपून कामगार वर येण्यासाठी आठजण बकेटमध्ये बसले, मात्र खालून वर येईपर्यंत घटना घडेल याची काहीच कल्पना कोणाला नव्हती. मात्र तो वायरोप तसाच स्पीडमध्ये वर खेचत गेला आणि ज्या ठिकाणी जमिनीवर थांबवायचा असतो त्या ठिकाणी वायरोप न थांबल्याने स्पीडमध्ये खालून आलेले बकेट वरील लोखंडी रॉडला जाऊन आदळले. वायरोप तुटून दोनशे फूट खोल बोगद्यात आदळले. यामध्ये असलेले आठ कामगार छिन्न विच्छिन्न खाली पडले.
घटनेची माहिती समजताच अकोले परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र घटना झाल्यानंतर २० मिनिटात भिगवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरुवात झाली. पोलीस प्रशासन आणि बोगद्यावर काम करणारे कामगार यांच्या मदतीने तातडीने मृतदेह दुसऱ्या बकेटच्या साहाय्याने वर काढण्यात आले. एक तासाच्या आता मृतदेह वर काढून शवविच्छेदन करण्यासाठी इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या नंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली आणि रात्री तीनच्या दरम्यान कामगारांच्या पत्याची चौकशी करून मृतदेह रुग्णवाहिकेत त्यांच्या गावी पाठवण्यात आले.