तोतया पोलीस अधिकाऱ्याला पकडले
By Admin | Published: August 28, 2016 05:20 AM2016-08-28T05:20:51+5:302016-08-28T05:20:51+5:30
पोलीस असल्याचे सांगून नागरिकांची कागदपत्रे तपासणाऱ्या तोतया सहायक निरीक्षकाला समर्थ पोलिसांनी पकडले. तो एका निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा असून, राज्य गुप्त वार्ता विभागात
पुणे : पोलीस असल्याचे सांगून नागरिकांची कागदपत्रे तपासणाऱ्या तोतया सहायक निरीक्षकाला समर्थ पोलिसांनी पकडले. तो एका निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा असून, राज्य गुप्त वार्ता विभागात असल्याचे सांगत फिरत असल्याचे समोर आले आहे. साध्या वेशात फिरून नागरिकांना दमदाटी; तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना करणे आदी कामे करीत होता.
केदार संजय तपस्वी (वय २२, रा. कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. केदार महाविद्यालयात शिकत असून, बाहेरून परीक्षा देतो. त्याच्यावर अशाप्रकारचे गुन्हे फरासखाना, वानवडी येथे दाखल आहेत. समर्थ पोलीस ठाण्यात जाऊन त्याने सांगितले की, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एसआयडी म्हणून पथक नेमले आहे. मी दहीहंडी बंदोबस्ताकरिता असल्याचे सांगितले.
समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौकांमध्ये जाऊन तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बंदोबस्ताबाबत आदेशही दिले. नागरिकांना अडवून त्यांच्या वाहनांची तपासनी करीत होता. त्या वेळी पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला पकडून चौकशी केली. त्याच्याकडे राज्य गुप्त वार्ता विभागाचे बनावट ओळखपत्रही मिळाले आहे. अनेकवेळा महापालिकेच्या वॉर्डस्तरीय बैठकीत पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिला असल्याचे समोर आले आहे.