सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश स्फोटांचा शोध; मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने नोंदवली निरीक्षणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:10+5:302021-07-15T18:39:38+5:30
पुणे : इंडियन पल्सार टायमिंग अॅरे (आयएनपीटीए) या खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या २० शास्त्रज्ञांच्या गटाने सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश सौरस्फोटांची ...
पुणे : इंडियन पल्सार टायमिंग अॅरे (आयएनपीटीए) या खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या २० शास्त्रज्ञांच्या गटाने सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या तोफगोळासदृश सौरस्फोटांची वैश्विक स्पंदकाद्वारे (पल्सार) निरीक्षणे मिळविण्यात यश मिळवले आले आहे. खोडद येथील अद्ययावत मीटरवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या (यूजीएमआरटी) साहाय्याने आणि मिलिसेकंद पल्सार सिग्नलच्या आधारे ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत.
यूजीएमआरटीमध्ये कमी वारंवारितेच्या रेडीओलहरींचे निरीक्षणे घेण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाले आहे. विश्वातील सर्वच अचूक घड्याळ असलेल्या ‘पल्सार’वर संशोधन करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांच्या गटाने केलेले हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सूर्याच्या आंतरिक भागात होणाऱ्या चुंबकीय बदलांमुळे पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटांना सौरस्फोट असे म्हणतात. कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) नावाच्या सौरस्फोटांत प्लाज्माची घनता जास्त असते. या स्फोटांचा आकार पृथ्वीपेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. त्यातून बाहेर पडलेले प्रभारित कण अंतराळात फेकले जातात. या संदर्भातील हे संशोधन आहे. मोठ्या ता-यांचा स्फोट झाल्यावर पल्सारची निर्मिती होते. या पल्सारमधून बाहेर पडणारी बीम अत्यंत वेगाने फिरते. त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिओ फ्लॅशला अचूक वेळ असते. त्यामुळे त्याला वैश्विक स्पंदक किवा विश्वातील सर्वात अचूक घडयाळ म्हणतात.
संशोधनातून काय समोर आले?
- पल्सारमधून निघणारे सिग्नल आणि अत्यंत कमी वारंवारितेच्या गुरुत्वीय लहरींचे दर १४ दिवसांनी यूजीएमआरचीच्या साहाय्याने निरीक्षणे घेतली जातात.
- गुरुत्वीय लहरी जर बाजूने जात असतील तर या पल्सार सिग्नलमध्ये थोडा विलंब होतो.
- सौरस्फोटांतून निर्माण होणाऱ्या प्रभारित कणांमुळे वैश्विक स्पंदकातून येणाऱ्या सिग्नलच्या अवधीत अतिसूक्ष्म विलंब झाल्याचे निदर्शनास आले. त्यातूनच सौरस्फोटांचे संशोधनातून समोर आले.
''पल्सार हा सूर्यापेक्षा दीड पट वजनाचा आहे. तसेच त्याचा व्यास दहा किमीचा आहे. हे संशोधन पल्सारसंबंधी आहे. पण ते करत असतानाच पल्सार सिग्नलवर कोरोनल मास इजेक्शनचा होणारा परिणाम होत असल्याचे अद्ययावत जीएमआरटीच्या सहाय्याने टिपणे आम्हाला शक्य झाले.'' असे एनसीआरए शास्त्रज्ञ प्रा. भालचंद्र जोशी यांनी सांगितले आहे.