नानासाहेब पेशव्यांच्या समाधी स्थळाची दुरावस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:38 PM2018-05-14T17:38:41+5:302018-05-14T17:38:41+5:30
मुठा नदीच्या पात्रात पूना हाॅस्पिटल जवळ थाेरल्या बाजीराव पेशव्यांचे थाेरले चिरंजीव श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची समाधी अाहे. गेल्या काही दिवसांपासून या समाधीची दुरावस्था झाली अाहे.
पुणे : थाेरल्या बाजीराव पेशव्यांचे थाेरले चिरंजीव श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांची नदी पात्रात असलेल्या समाधीस्थळाची दुरावस्था झाली अाहे. त्याचबराेबर येथे असलेल्या त्यांच्या पादुकांचा भाग ताेडण्यात अाल्याचेही समाेर अाले अाहे. प्रशासनाकडून या समाधीकडे दुर्लक्ष करण्यात येत अाहे. त्यामुळे एेतिहासिक वारसा असलेल्या या ठिकाणाकडे प्रशासन लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.
मुठेच्या पात्रात पूना हाॅस्पिटल जवळ नानासाहेब पेशवे यांची समाधी अाहे. गेल्या अनेक दिवसांपासून या समाधीची दुरावस्था झाली अाहे. या समाधीच्या अाजूबाजूला माेठ्या प्रमाणावर अस्वच्छता असल्याचे चित्र अाहे. त्यातच या समाधीच्या मधाेमध असलेल्या नानासाहेबांच्या पादुका ताेडून नेण्यात अाल्या अाहेत. या समाधीच्या अाजूबाजूला गवत वाढले असून बाटल्यांचा काचा पडल्या अाहेत. तसेच या ठिकाणी अनेक दारुच्या बाटल्या सुद्धा अाढळल्या अाहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथे नेमके काय चालते, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. या समाधीच्या मागील बाजूस नानासाहेब पेशव्यांचे कार्य चित्रांच्या माध्यमातून मांडण्यात अाले अाहे. परंतु या चित्रांची सुद्धा दुरावस्था झाली अाहे.
याबाबत बाेलताना पुणे महानगर पालिकेच्या पुरातत्व विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे म्हणाल्या, या समाधीच्या साफसफाई बाबात अाणि दुरुस्ती बाबत त्या ठिकाणच्या वार्ड अाॅफिसला सांगण्यात अाले अाहे. त्यांना या ठिकाणची दुरुस्ती करण्याचे पत्र देखील दिले अाहे. त्यांना पुन्हा एकदा पत्र काढून या ठिकाणी झालेल्या दुरावस्थेबाबत लक्ष घालण्यास सांगण्यात येत अाहे.
काेण हाेते श्रीमंत बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवे
या समाधी जवळ लिहिलेल्या इतिहासानुसार थाेरल्या बाजीराव पेशव्यांचे थाेरले चिरंजीव नानासाहेब पेशवे हाेते. मराठी राज्याच्या सीमा पूर्वेला अाेरिसा-बंगाल पर्यंत तर पश्चिमेला अटक-पेशावर पर्यंत नानासाहेब पेशव्यांच्या काळात विस्तारल्या. इ.सन 1752 मध्ये दिल्लीच्या मुघल सल्तनतीने मराठ्यांना हिंदुस्थानचे संरक्षक म्हणून सनदा दिल्या. मराठी ताकदीचे दर्शन हिंदुस्थानालाच नव्हे तर अफगाणिस्तान, इराणलाही जाले. श्रीमंत नानासाहेबांनी स्वतः बंगालपासून कर्नाटकापर्यंत स्वाऱ्या केल्या अाणि मराठी दाैलतीला वैभव प्राप्त करुन दिले. सत्ता, दरारा अाणि वचक कळसाला पाेहचला. पुण्याची माेठी भरभराट त्यांच्या काळात झाली. ते कामात तरबेज हाेते. पत्रलेखनात त्यांचा हातखंडा हाेता. विश्वासराव अाणि सदाशिवरावभाऊ यांच्या मृत्युने नानासाहेबांना माेठा धक्का बसला. या धक्क्यातून ते सावरले नाहीत अाणि वयाच्या 41 व्या वर्षी त्यांचे पर्वतीवर देहावसान झाले.