देशाला स्पोर्ट्स पॉवर करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:32+5:302021-08-28T04:15:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खेळामुळे शरीराबरोबर व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुऴेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खेळामुळे शरीराबरोबर व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुऴेच खेळांना महत्त्व देण्याची गरज आहे. येत्या काळात भारताला स्पोर्ट्स पॉवर बनवण्याचा संकल्प असून त्यासाठी योग्य त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
पुण्यातील घोरपडी परिसरातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमधील स्टेडियमचे ‘नीरज चोप्रा स्टेडियम’ असे नामकरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्ट जनरल जे. एस. नैन, कर्नल आर. यादव यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय सेना दलातर्फे सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांच्या सोबत ऑलम्पिक खेळात सहभागी झालेल्या २३ खेळाडूंचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजनाथ सिंह म्हणाले, खेलो इंडिया, फिट इंडिया याच्या माध्यमातून देशात खेळाची संस्कृती निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार करत आहे. सर्व प्रकारच्या खेळांना महत्त्व देऊन त्याच्यात प्रावीण्य मिळवणे गरजेचे आहे.
सुभेदार नीरज चोप्रा याला मिळालेल्या सुवर्णपदकामुळे जगभरातील भारतीयांची मान गौरवाने उंचावलेली आहे. लष्कराच्या विविध खेळाडूंनी ऑलम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पदक मिळवणाऱ्यांसोबतच स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू ही देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन काळात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशातील खेळाडूंनी सराव करत यश संपादित केले. त्यांची ही कामगिरी काैतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे देशभरातील युवकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. खेळात पदक महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास होतो. महिला खेळाडू ही देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे येत आहेत. महिलांच्या हॉकी संघाने उत्कृष्ट कामगिरी आॅलंम्पिक स्पर्धेत करत हे सिद्ध केले आहे. येत्या काळातही खेळाडू परिश्रम करत सर्वोत्तम प्रदर्शन करत, जगात देशाची मान उंचावतील, अशी आशा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली.
चौकट
भारताला ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळावी
भारत सर्वत क्षेत्रात आज प्रगती करत आहेत. विविध खेळांमध्ये देशाचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी येत्या काळात भारताला ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळणे महत्त्वपूर्ण असल्याचे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
चौकट
शुरांच्या चरित्रात खेळांना महत्त्व
भारतीय इतिहासात खेळांना अनन्यसाधारण महत्त्व होते. खेळांमुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. महाराष्ट्राच्या इतिहास पाहिला तर खेळामुळेच शिवा नामक मुलगा पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज बनले. देशातील शूरवीरांच्या चरित्र अभ्यासल्यास खेळांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. खेळ आणि सैन्य यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करत, सैनिकात नेहमीच एक प्रामाणिक खेळाडू आणि खेळाडूत एक प्रयत्नशील सैनिक असतो, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.
फोटो