पैसा बदलणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट
By admin | Published: November 17, 2016 03:54 AM2016-11-17T03:54:55+5:302016-11-17T03:54:55+5:30
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या नोटांच्या रूपातील काळा पैसा बदलून देण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.
येरवडा : केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या नोटांच्या रूपातील काळा पैसा बदलून देण्यासाठी एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. अगदी दोन-अडीच लाखांपासून ते कोटीतील रकमा बदलून देण्याची तयारी हे एजंट दाखवत आहेत. या संधीचा फायदा घेऊन अनेक काळ्या पैशावाल्यांनी आपले उखळ पांढरे केल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशावालांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. आता आपले कसे होणार, या चिंतेत असतानाच बाजारात नोटा बदलून त्याबदल्यात सोने अथवा १०० रुपायांखालील चलन देणाऱ्या एजंट निर्माण झाल्याने काळ्या पैसेवाल्यांना काळे धन लपवण्याचा मार्ग पुन्हा सापडत आहे. पाचशे व हजारांच्या बदल्यात सोने घेतल्यास त्याचा भाव सुमारे ५१ हजार रुपये प्रतितोळा सांगितला जात आहे. तर या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या नोटा देताना २० ते ४० टक्के रक्कम कपात केली जात असल्याच्या चर्चा आहेत. अनेक करोडपतींनी त्यांच्याकडील पैसा अशा प्रकारे पांढरा केल्याचेही समजते. तसेच बँकेमध्ये अडीच लाखांपर्यंत रक्कम भरता येणार असल्याने, काहींनी या नियमाचा फायदा घेतला आहे. आपल्या जवळच्या अनेक व्यक्तींच्या खात्यावर अडीच लाख रुपये भरून काळा पैसा पांढरा करण्यात येत आहे. यासाठी काळा पैशावाले कमिशन देण्याचीही तयारी दाखवत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे मात्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केलेल्या योजनांना हरताळ फासला जात आहे.