हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:25 AM2017-12-30T01:25:27+5:302017-12-30T01:25:30+5:30
नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे.
नसरापूर : पाणी नेण्यास आमचा विरोध नाही, मात्र भोर, वेल्हा व हवेलीला पाणी देण्याविषीचे नियोजन येथील जनतेला डावलून केलेले आहे. येथील जनतेवर होत असलेला अन्याय सहन करणार नाही. या योजनेत या तिनही तालुक्यांचा विचार करून सुधारणा केलीच पाहिजे; अन्यथा पाणी पोहोचू दिले जाणार नाही. याप्रकरणी या प्रकल्पाच्या तीन अधिकाºयांविरुद्ध विधानसभेत विशेषाधिकार हक्कभंग समितीकडे दाखल केलेला असून अध्यक्षांनी तो स्वीकारलेला आहे, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
पाणीवाटपाबाबत चुकीच्या अहवालाला विरोध करीत आमच्याच हक्काच्या पाण्यासाठी संघर्षाचा निर्धार भोर, वेल्हे व हवेली तालुक्यातील सर्व राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी केला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने नसरापुरातील जनसुनावणी आज रद्द केली, तर या तालुक्यातील सर्वच्या सर्व ग्रामपंचायतींनी या अहवालाच्या विरोधात ठराव दिले. पाणीप्रश्नासाठी पक्ष बाजूला सारून संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. भोर तालुक्यातील नसरापूर येथे गुंजवणी पाणी संघर्ष समितीने आयोजिलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात सर्व जण एकवटले. मेळाव्यास शिवसेनेचे रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, शैलेश वालगुडे, राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड, शिवनाना कोंडे, भाजपचे विश्वास ननावरे, सुधीर शेडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विलास बोरगे, संतोष दसवडकर, दिगंबर चोरघे, बळीराजा शेतकरी संघाचे यशवंत कदम, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे, सचिव अरविंद सोंडकर, संपतराव अंबवले, मुरलीधर दळवी यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील सर्वपक्षीय नेतेगण, शेतकरी, महिलावर्ग मोठ्या संख्येने हजर होता.
येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही केलेले नाही. त्यांचे पुनर्वसन नवीन विमानतळाशेजारी करून दाखवा, त्यावर येथील शेतकºयांचे पुनर्वसन करावे; अन्यथा आमचा बांधवांच्या आम्ही पाठीशी असल्याचा निर्धार रमेश कोंडे यांनी जनतेसमोर जाहीर केला, तर शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे म्हणाले, की या धरणाकरिता येथील सुजाण नागरिकांनी या धरणाकरिता आपल्या जमिनी दिल्या हा त्याग मोठा नाही का? या धरणासाठी शिवसेनेने काम सुरू करून या जलसंपदामंत्र्यांनी धरणाचे काम पूर्णत्वाकडे नेले. असे असतानाही या जनतेच्या पाण्यावरील हक्काला वंचित राहू देणार नाही. शेतकºयांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या वेळी माजी उपसभापती विक्रम खुटवड, संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनकर धरपाळे यांचीही भाषणे झाली. मनसेचे विलास बोरगे, भाजपाचे विश्वास ननावरे यांनी पाठिंबा दिला. दिलीप बाठे यांनी सूत्रसंचालन केले. मदन खुटवड यांनी आभार मानले.