‘देवा श्रीगणेशा’ ऑनलाइन चित्र प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:14 AM2021-09-10T04:14:47+5:302021-09-10T04:14:47+5:30
पुणे : गणेशोत्सव काळात कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे आणि चित्रकार-व्यंगचित्रकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करता यावे, यासाठी महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुपच्या ...
पुणे : गणेशोत्सव काळात कलाकारांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे आणि चित्रकार-व्यंगचित्रकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करता यावे, यासाठी महाराष्ट्र व्यंगचित्रकार ग्रुपच्या कार्टून्स कट्ट्यातर्फे दि. १० ते १९ सप्टेंबर दरम्यान ‘देवा श्रीगणेशा’ ऑनलाइन चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेच्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया व्यासपीठाद्वारे गणरायाच्या आगमनाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. १०) या ऑनलाइन प्रदर्शनाला सुरुवात होणार आहे. देशातील ५० चित्रकार-व्यंगचित्रकार त्यांच्या चित्रशैलीतील १०० गणरायाची विविध मनोहारी रुपे उलगडणारी चित्रे रसिकांना पाहता येणार असल्याची माहिती कार्टून्स कट्ट्याचे संयोजक घनश्याम देशमुख यांनी दिली.
या प्रदर्शनात प्रमोद कांबळे, रामकृष्ण कांबळे, राम देशमुख, तुषार रोकडे, स्वाती गोडबोले आदी चित्रकार-व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनातून चित्रकार-व्यंगचित्रकार आपल्या कलेचा नव्याने श्रीगणेशा करणार आहेत. दहा दिवस, दहा गणपती आणि दहा रंगमाध्यमे अशी प्रदर्शनाची संकल्पना आहे. प्रदर्शनात देशमुख हे दहा दिवस, एक रंगमाध्यम वापरून गणपतीची दहा चित्रे साकारणार आहेत. त्याची प्रात्याक्षिक ऑनलाइन पाहायला मिळतील. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विनामूल्य आहे. देशभरातील चित्रकार-व्यंगचित्रकारांचा कलाविष्कार यातून रसिकांना पाहता येणार आहे.
---------------------------------------