देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 10:40 AM2022-08-18T10:40:24+5:302022-08-18T10:40:46+5:30
‘टाइम्स ऑफ इंडिया’ पुणे उपनिवासी संपादक अभिजित अत्रे आणि नाशिक येथील दैनिक ‘देशदूत’च्या संपादक वैशाली बालाजीवाले यांचाही सन्मान
पुणे : आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराची घोषणा बुधवारी करण्यात आली. त्यात ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ पुणे उपनिवासी संपादक अभिजित अत्रे आणि नाशिक येथील दैनिक ‘देशदूत’च्या संपादक वैशाली बालाजीवाले यांना देण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे वितरण भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते व खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि. २०) सकाळी ११ वा. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होणार आहे, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.
यामध्ये आश्वासक पत्रकार पुरस्कार ‘केसरी’च्या कोल्हापूर ब्यूरो चीफ अश्विनी टेंबे, ‘महाराष्ट्र टाइम्स’ पिंपरी-चिंचवडचे विशेष प्रतिनिधी सुनील लांडगे आणि पुणे ‘सकाळ’च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, छायाचित्रकार पुरस्कार सांगलीचे आदित्य वेल्हाळ आणि पुणे येथील ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीचे रुख्मांगद पोतदार, व्यंगचित्रकार पुरस्कार घनश्याम देशमुख, सोशल मीडिया पुरस्कार नाशिक येथील ‘द फोकस इंडिया’चे संपादक विनायक ढेरे, पुणे येथील अमित परांजपे आणि सांगली येथील विनीता तेलंग यांना देण्यात येणार आहे.
देवर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. या उपक्रमाचे हे ११ वे वर्ष असून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरद कुंटे असणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे हा पुरस्कार कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत.