पर्यावरणाला धक्का न लावता, किल्ले सिंहगडचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:11 AM2021-09-18T04:11:11+5:302021-09-18T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, अशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : किल्ले सिंहगड परिसराचा पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे दिल्या. पर्यावरणाला धक्का न बसता, आपला पुरातन वारसा जपला जाईल आणि विकासही करता येईल, अशा प्रकारे कामे करा, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करावा. वाहनतळावर वाहन चालकांसाठीही सुविधा असावी. पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा, हा दृष्टिकोन समोर ठेवून विकास करावा. येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाइड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावे. पर्यटकांना पिठलं-भाकरीसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव चाखता आली पाहिजे, परंतु हे सर्व करत असताना किल्ल्याच्या सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी सादरणीकरणाद्वारे किल्ल्याच्या परिसरातील विकास आराखड्याची माहिती देण्यात आली. बैठकीस सिंहगड वनहक्क समितीचे सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.