फळांची प्रतवारी करण्याचे तंत्रज्ञान विकसित : लोणीतील प्राध्यापकाचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 10:02 PM2018-07-18T22:02:07+5:302018-07-18T22:05:34+5:30
राहता तालुक्यातील लोणी येथे पी. व्ही. पी. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात कार्यरत आहेत. या यंत्रांचा शोध लावल्यावर त्याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे.
पुणे : फळांंना चांगला दर मिळवण्यासाठी त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे असते, ही प्रतवारी करण्याचे किचकट काम इलेक्ट्रॉनिक यंत्राव्दारे करण्याचे तंत्रज्ञान लोणी येथील पी. व्ही. पी. महाविद्यालयाचे प्रा. अशोक कानडे यांनी शोधून काढले आहे. त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ आणि ‘फ्रूट सॉर्टर’ अशी दोन यंत्रे विकसित केली आहेत.
प्रा. अशोक कानडे यांनी हे संशोधन पेरू फळाविषयी केले असून ते इतरही फळांसाठी लाभदायी ठरू शकते. या यंत्राच्या साहाय्याने फळ विक्रेत्यांना फळाची पक्वता व गुणवत्ता समजू शकणार आहे. त्यामुळे या तंत्राचा व्यवहारात उपयोग शक्य आहे, असे कानडे यांनी व्यक्त केले. ते राहता तालुक्यातील लोणी येथे पी. व्ही. पी. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात कार्यरत आहेत. या यंत्रांचा शोध लावल्यावर त्याची यशस्वी चाचणीदेखील घेण्यात आली आहे. या संशोधनासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व इलेक्टॉनिक सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी मार्गदर्शन केले.
पेरू फळाच्या वर्गीकरणासाठी (क्लासिफिकेशन) आणि प्रतवारी (ग्रेडिंग) करण्यासाठी या यंत्रांचा वापर करता येतो. या यंत्रांना मेटल आॅक्साइड सेमिकंडक्टर सेन्सर असे म्हटले आहे. स्थानिक शेतकºयांच्या गरजांचा अभ्यास करून प्रा. कानडे यांनी हे तंत्रज्ञान शोधले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पेरूसह इतर फळ उत्पादकांनाही या यंत्रांच्या सहाय्याने चांगल्या प्रतीची फळे बाजारपेठेत पाठवता येतील. योग्य पद्धतीने वर्गीकरण झाल्याने दर त्यानुसार देता येतील आणि फ्रुट सॉर्टरमुळे फळाच्या आतमधील किड किंवा तत्सम प्रकार समोर येतील. त्यामुळेही चांगल्या दर्जाचे कीड विरहित फळ देता आल्याने दर उत्तम मिळू शकेल. एकूणच शेतकºयांना आपल्या फलोत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी हे सहाय्यक पाऊल ठरणार आहे.
................
प्रा. अशोक कानडे यांनी तयार कलेले ‘इलेक्ट्रॉनिक नोज’ हे माणसाप्रमाणे वास ओळखून फळ किती पिकले आहे त्यानुसार प्रतवारी सांगते. प्रत्यक्ष माणूस वास घेऊन फळ पिकले आहे की नाही हे फार वेळ बरोबर ओळखू शकत नाही. कारण सतत वास घेतल्याने काही वेळाने प्रतवारी अचूक सांगणे शक्य होत नाही. मात्र यांत्रिक पद्धतीने कमी वेळात अधिक फळांची अचूक प्रतवारी करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर यंत्रामुळे निर्दोषता वाढण्यास मदत होणार आहे.