योग्य अंमलबजावणी झाली तरच महाराष्ट्राचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:14+5:302021-03-09T04:14:14+5:30
पुणे : क्रीडा विद्यापीठ आणि कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेसह राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय व उच्च शिक्षण विभागासाठी केलेली विविध तरतुदीबाबत शिक्षणतज्ञांकडून ...
पुणे : क्रीडा विद्यापीठ आणि कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेसह राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय व उच्च शिक्षण विभागासाठी केलेली विविध तरतुदीबाबत शिक्षणतज्ञांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. तसेच शिक्षण क्षेत्रासह आरोग्य आणि कृषी, वाहतूक आदी क्षेत्रासाठीही योजना राबविल्या जाणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पातील सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी झाली तरच महाराष्ट्राचा विकास होईल, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
राज्याच्या अर्थ संकल्पात शालेय शिक्षण विभागासाठी २ हजार ४६१ कोटी तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाला १ हजार ३९१ कोटींची तरतुद केली आहे. तसेच पुण्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केले जाणार असून पहिल्या टप्प्यात क्रीडा विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा शिक्षण व प्रशिक्षण अशा चार अभ्यासक्रमांसाठी २०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच पुण्यातील बी.जे. मेडिकल महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा शासनाचा मानस असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
----
कोरोनामुळे राज्य शासनाकडून फारशी अपेक्षा नव्हती. परंतु, तरीही शासनाकडून शालेय व उच्च शिक्षणासाठी केलेल्या भरीव तरतुदीबाबत समाधान मानले पाहिजे.
-डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
---
अर्थसंकल्पात विविध अंगांनी विचार केला असला तरी प्रस्तावित नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्ट्रीने तरतुद केलेली नाही. तसेच डिजिटल शिक्षणासाठी व मराठी शाळांच्या सक्षमिकरणासाठी तरतुद करणे अपेक्षित होते.
डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
---
क्रीडा विद्यापीठ व कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेचा निर्णय स्वागतार्गह असला तरी शासनाला आणखी भरीव तरतुद करता आली असती. तसेच २००१ नंतरच्या महाविद्यालयांना अनुदान मिळावे,अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत निराशा झाली.
- ए. पी. कुलकर्णी, प्रांत प्रमुख, विद्यापीठ विकास मंच
--
शेती, आरोग्य, वाहतुक, क्रीडा विद्यापीठ व कौशल्य विद्यापीठ आदी बाबींवर अर्थसंकल्पात भर दिला आहे. अर्थसंकल्प सर्व समावेशक असले तरी त्यातील सर्व गोष्टींची अंमलबजावणी योग्य पध्दतीने झाली तर महाराष्ट्राचा विकास होईल.
- डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ
--
विद्यार्थी हिताच्या दृष्टीने चांगल्या योजना राबविल्याचे दिसून येत आहे. क्रीडा विद्यापीठामुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय स्थरावरील खेळाडू निर्माण होतील. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागतच केले पाहिजे. परंतु, शालेय व उच्च शिक्षणासाठी आणखी तरतूद हवी होती.
- डॉ. वासुदेव गाडे, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ