महापालिकेच्या ४२ अॅमिनिटी स्पेसचा स्मार्ट सिटीकडून विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:03 AM2018-12-17T02:03:45+5:302018-12-17T02:04:07+5:30
स्मार्ट सिटी एरियातील बाणेर-औंध - बालेवाडी भागातील ४२ अॅमिनिटी स्पेस विकासासाठी स्मार्ट सिटीने मागितल्या आहेत.
पुणे : स्मार्ट सिटीच्या बाणेर-औंध-बालेवाडी या भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४२ अॅमिनिटी स्पेस या कंपनीच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहे. दरमहा एक रुपये नाममात्र भाडे दराने या जागा देण्यात येणार आहे. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर स्मार्ट सिटीने या जागा विनाअट महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या ठरावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली.
स्मार्ट सिटी एरियातील बाणेर-औंध - बालेवाडी भागातील ४२ अॅमिनिटी स्पेस विकासासाठी स्मार्ट सिटीने मागितल्या आहेत. महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या संयुक्त प्रकल्प म्हणून दरमहा एक रुपये भाडे आकारले जाणार आहे. या जागा विकसित करण्याचा खर्च स्मार्ट सिटीने करायचा आहे. या प्रकल्पाचा लाभ नागरिकांना मोफत किंवा वाजवी शुल्क आकरण्याचा अधिकार पालिका आयुक्ताना असणार आहे. पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च स्मार्ट सिटीने करायचा आहे. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर स्मार्ट सिटीने संबंधित विकसित जागेचा विनाअट ताबा महापालिकेला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे यांनी दिली.
स्मार्ट सिटी एरियामधील जागा बरोबर बालेवाडी स. नं. ३५ आरक्षित जागा स्मार्ट सिटीअंतर्गत उद्यान विकसित करणे. कर्वेनगर येथील अस्तित्वात असलेले, पालिकेच्या ताब्यातील प्ले ग्राउंड स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करणे. प्रभाग क्र. २८ क घोरपडी पेठ येथील श्रीमंत भैरवसिंग घोरपडे उद्यान अर्धवट असलेले कामे करणे. खराडी क्षेत्र समोरील ताब्यात असलेले प्ले ग्राउंड विकसित करावे. सैदराबाई शाशेजारील ७ एकरमधील गार्डन स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत विकसित करावे. प्रभाग ३८ मधील कात्रज राजस सोसायटीतील मोरया उद्यान व कात्रज स. नं. ४८ येथील उद्यान आरक्षणाची जागा विकसित करण्याचीही उपसूचनाही मंजूर करण्यात आली आहे, असेही सुशील मेगंडे यांनी सांगितले.
ग. दि. माडगुळकर स्मारक उभारणार
कोथरुड येथील स. नं. ६९, ७० येथील एक्झिबिशन ग्राऊंड येथील आरक्षित जागेवरील नियोजित इमारतीमध्ये ग. दि. माडगुळकर स्मारक उभारण्यास शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.
- सुशील मेंगडे, अध्यक्ष शहर सुधारणा समिती