नीरा-नृसिंहपूरचा तीन वर्षांत विकास
By admin | Published: January 5, 2017 03:28 AM2017-01-05T03:28:51+5:302017-01-05T03:28:51+5:30
नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा येत्या तीन वर्षांत सर्वांगीण विकास करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नीरा-नृसिंहपूर/बावडा : नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा येत्या तीन वर्षांत सर्वांगीण विकास करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या विकासासाठी २६० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील २२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान प्राचीन आहे. येथे देशभरातून भाविक येतात. या भाविकांना चांगल्या सुविधा व्हाव्यात, यासाठी देवस्थानचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. देवस्थानच्या विकासाबरोबरच परिसराचाही विकास होईल. त्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील, याचा स्थानिक युवकांना लाभ होईल. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी २६० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २२ कोटी आणि पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांची विकासकामे केली जात असल्याचे सांगितले.
या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यटक निवास, भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृहाच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
या वेळी सार्वजनिक बांधकामचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, सार्वजनिक बांधकामचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे, इंदापूरचे सभापती विलासराव वाघमोडे, पोलीस अधीक्षक जय जाधव, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, सरपंच रूपाली काळे, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर, माऊली चवरे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, अतुल तेरखेडकर, सदानंद शिरदाळे, मारुतराव वणवे, पांडुरंग शिंदे, तानाजीराव थोरात, अशोक वणवे, डॉ. नीलेश शिंगाडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुनाके यांनी सूत्रसंचालन केले.