विकास आराखडा सर्वसामान्य व्यक्ती व शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारा : कंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:25+5:302021-08-25T04:14:25+5:30
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील समाज प्रबोधन केंद्रामध्ये हवेली तालुकातील पूर्व भागातील बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. ...
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील समाज प्रबोधन केंद्रामध्ये हवेली तालुकातील पूर्व भागातील बाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी पुणे महानगर विकास आराखडा विरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली, त्या बैठकीमध्ये कंद बोलत होते.
या वेळी पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पिंपरी सांडसचे सरपंच राजू भोरडे, वाडेगावचे सरपंच दीपक गावडे, श्रीमंत झुरुंगे, दीपक लोणारी, विपुल शितोळे, भाऊसाहेब शिंदे, विकास तळेकर, मोतीराम लकडे, स्वप्निल लोले, नरसिंग लोले, सचिन कोतवाल, विलास गोते, माजी सरपंच बाळासाहेब औताडे, ज्ञानेश्वर झुरुंगे व इतर मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कंद म्हणाले की, मी ज्यावेळी पुणे महानगरचा सदस्य होतो, त्या वेळी झालेल्या २/३ बैठकीत सुचविलेल्या विविध पर्यायांपैकी कोणताच पर्याय नव्याने जाहीर झालेल्या विकास आराखड्यात नाही. हा विकास आराखडा हा सर्वसामान्य व्यक्ती व शेतकऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त करणारा ठरणार आहे. त्यासाठी सर्वांनी पक्षविरहित एकत्र येऊन त्यास विरोध करणे गरजेचे आहे.
वाडे बोल्हाईचे सरपंच दीपक गावडे म्हणाले की, आमचे गाव पुण्याच्या शेजारी असूनही आमचे गाव आर झोन पासून वंचित आहे. त्यामुळे या विकास आराखड्यास भकास आराखडा म्हणावा लागेल. पिंपरी सांडसचे सरपंच राजेंद्र भोरडे म्हणाले की, रिंग रोडपरिसरात पुढील ५० वर्षांत खूप मोठी वसाहत होणार असून पूर्व हवेलीमधील सर्वच गावांमध्ये एकूण क्षेत्रफळापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्र आर झोन होणे अपेक्षित होते, परंतु मोजकी ४ गावे सोडली तर खालील कोणत्याच गावात आर झोन झाला नाही. शिरसवडीचे माजी सरपंच बाळासाहेब औताडे म्हणाले की, या विकास आराखड्यास विरोध करताना वेळप्रसंगी कोर्टाचे दरवाजे खटखटावे लागले तरी चालेल, परंतु सर्वांच्या भविष्यासाठी ठाम विरोध करणे गरजेचे आहे.
पेरणे, लोणीकंद, बकोरी, केसनंद, वाडेबोल्हाई, अष्टापूर, पिंपरी सांडस, डोंगरगाव आदी गावांतील मोठ्या संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते. या वेळी विकास आराखडा कृती समिती स्थापन करण्यात आली.
विकास आराखड्यामध्ये मोजकीच ५ ते ६ गावे सोडून इतर कोणत्याच गावात कोठेच शेतीव्यतिरिक्त झोनिंग झालेले नाही, त्यामुळे यास विकास आराखडा म्हणतात येणार नाही, या चुकीच्या आराखड्याचा फटका पुढील २ पिढ्यास बसणार असून आजच सर्वांनी एकत्र येऊन त्यास विरोध करणे गरजेचे आहे.
पै. संदीप भोंडवे
सरचिटणीस- विकास आराखडा कृती समिती.
पेरणेफाटा येथे पुणे महानगर विकास आरखडा बाधित शेतकरी बैठक झाली, या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद बोलताना या वेळी मान्यवर.
छाया के. डी. गव्हाणे