जेजुरी गडाच्या विकासासाठी २९० कोटींचा विकास आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:59+5:302021-07-16T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडाच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी गडाच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभागाच्यावतीने जेजुरी गडाचा प्राथमिक विकास आराखडा तयार केला असून, सुमारे २९० कोटींच्या आराखड्यावर शुक्रवार (दि. १६) रोजी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर पवार यांच्या सूचनेनुसार अंतिम विकास आराखडा तयार करुन शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील देहू-आळंदी देवस्थान विकास आराखडा, अष्टविनायक विकास आराखडा मंजूर होऊन विकासकामे सुरू आहे. परंतु महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले व दर वर्षी लाखो भाविक भेट देणारा जेजुरी गडाकडे तसे दुर्लक्षच झाले. अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय अभिभाषणातच जेजुरी खंडोबा गडाच्या विकास आराखड्याचा उल्लेख केला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने विकास आराखड्याची तयारी सुरू केली आहे. जेजुरी गड हेरिटेज गड असल्याने सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या मान्यतेनुसार व मार्गदर्शनाखाली करावी लागणार आहे.