पालखी मार्गाच्या कामात वनराई होतेय जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 11:40 AM2021-11-02T11:40:11+5:302021-11-02T12:04:20+5:30
इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत
रविकिरण सासवडे
बारामती: रस्त्यांना देशाची रक्तवाहिनी समजले जाते. ज्या ठिकाणचे रस्ते चकाचक झाले आहेत. तेथे प्रगतीची चाके वेगाने धावली. त्या भागाचा चौफेर विकास होण्यास मोठा हातभार लागला. मात्र या विकासाला नेहमी पुराण पुरूषाचा बळी द्यावा लागतो. त्याशिवाय विकास पावत नाही, असेच काहिसे चित्र पालखी मार्गावर दिसू लागले आहे. देहू ते पंढरपूर पालखी मार्गाच्या कामाला सध्या सुरूवात झाली आहे.
इंदापूर तालुक्यात पहिल्या टप्प्यात लासुर्णे, अंथुर्णे परिसरातील कामास वेग आला आहे. या परिसरातील महाकाय वटवृक्ष सध्या जमीनदोस्त होत आहेत. शेकडो वर्षांपासून या वटवृक्षांनी या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूवर सावली धरली. या वटवृक्षांच्या सावलीमध्ये अनेकांनी आपले छोटेमोठे व्यावसाय सुरू केले. या व्यावसायांच्या माध्यमातून कष्टकरी लोकांच्या घरात चुल पेटू लागली. त्यामुळे ही झाडे अनेकांच्या सुख-दु:खाचे साक्षीदार झाले. येथील चार पिढ्या या झाडांच्या सावलीतच वाढल्या. आज या झाडांवर करवतीचे घाव होत असताना अनेकांच्या काळजात चर्र झाले. डोळ्यांच्या कडा पाणवल्या.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पालखी सोहळ्यातील चैतन्य कोणालाही अनुभवता आले नाही. देहूमधून संत तुकोबारायांच्या पालखीने प्रस्थान केल्यानंतर पालखी आपल्या गावातून जाणार याचा आनंद पालखीमार्गावरील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. पालखी या परिसरात आल्यानंतर वारीमध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना देखील या वटवृक्षांचे कोण कौतुक वाटत असे. सणसर ते अगदी इंदापूर पर्यंत हे वटवृक्ष उभे आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना वारकऱ्यांना कधी उन्हाचा चटका जानवला नाही.
या वटवृक्षांच्या सावलीमध्ये वारकऱ्यांच्या अनेक पंगती उठल्या. भजन, कीर्तनाला रंग चढला. टाळ-मृदुंगाचा कल्लोळ, राम-कृष्ण-हरीचा घोषही या वटवृक्षांनी शेकडो वर्ष अनुभवला. मात्र विकासाची गंगा आली आणि सर्व वनराई उजाड करून गेली. ‘माझी इतुकी सेवा मानुनी घ्यावी, ठेवतो देह आता पंढरीनाथा’ अशीच काहीशी भावना या महाकाय वृक्षांची आता असेल. मनुष्यांच्या घरांचे नुकसान झाले म्हणून त्यांना भरपाई मिळाली परंतू एक वटवृक्ष कापल्याने हजारो जीवांचे घर उद्धवस्त झाले त्याची भरपाई आपण कशी करणार आहोत? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.
वडवर्गिय झाडांचे पुर्नरोपन करा...
विकास करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. वडवर्गिय झाडांचे पुर्नरोपन करण्याची गरज आहे. पालखी मार्गाच्या रूंदीकरणाची हद्द जिथे संपते त्यापासून दहाफुट अंतर सोडून वड, पिंपळ, उंबर या झाडांचे पुर्नरोपन केले तर त्या भागातील जैैवविविधता टिकून राहिल.
- डॉ. महेश गायकवाड
पर्यावरणतज्ज्ञ, बारामती
‘ग्रीन कॉरिडॉर’ची निर्मिती व्हावी ...
पुर्नरोपन योग्य झाडांसाठी वन विभागाच्या जागेमध्ये ‘ग्रीन कॉरिडॉर’ उभारण्यात यावेत. जेणेकरून ही झाडे वाचवली जातील. तसेच पालखी महामार्गाच्या कडेने जे नियोजित आराखड्यामध्ये देशी व स्थानिक प्रजातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून जैैवविविधता जपली जाईल.
- श्रीनाथ कवडे
वनस्पतीतज्ज्ञ व अध्यक्ष,
सोसायटी फॉर एन्व्हार्यमेंट अँड
बायोडायवरसीटी काँझरवेशन, पुणे