ड्रोन सर्व्हेमुळे गावच्या विकासाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:44+5:302021-09-05T04:14:44+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामती तलुक्यात गावठान भूमापन ड्रोन सर्व्हेक्षणास सुरवात लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण ...
उपमुख्यमंत्री अजित पवार : बारामती तलुक्यात गावठान भूमापन ड्रोन सर्व्हेक्षणास सुरवात
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : ड्रोन सर्व्हेमुळे गावठाण भूमापनात अचूकता येईल. प्रत्येक धारकाच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल. या माध्यमातून सीमा निश्चित होतील. त्याचा फायदा वैयक्तिक धारकासह ग्रामपंचायतीला होईल. त्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हे कामाचा शुभारंभ कटफळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाणचे भूमापन ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येत आहे. बारामतीमध्ये कटफळ येथे या योजनेचा शुभारंभ होत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. या योजनेचा फायदा सर्वच गावठाणाला मिळणे आवश्यक आहे. १८९० साली ब्रिटिशांनी मोजणीची अंमलबजावणी सुरू केली. त्यांना हे काम पूर्ण करण्यास ३७ वर्षे लागलीत. आजच्या काळात ड्रोनच्या सर्वेमुळे भूमापनामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतील. गावांचा विकास वाढेल, ड्रोन सर्व्हेनंतरही अडचणी वाटल्यास ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करावा व शंकांचे निराकारण करून घ्यावे. ग्रामस्थांनी भूमापनात अडथळा आणू नये, योग्य प्रकारे सर्व्हेक्षण करून घ्यावे. प्रत्येक गावाचा डिजिटल नकाशा तयार करून घ्यावा व सर्व्हेक्षण यंत्रनेला सर्वांनीच सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य एन. सुधांशु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे आयुष प्रसाद, उपसंचालक भूमी अभिलेख किशार तवरेज उपस्थित होते.
--------------------------
बारामती तालुक्यात एकूण ११८ गावे असून यापूर्वी ४७ गावांचे नगर भूमापन झालेले आहे. उर्वरित ७१ गावांपैकी १८ गावे यांना मूळ गावठाण नाही. त्यामुळे फक्त ५३ गावांचे नगर भूमापन करण्यात येऊन त्यांना मिळकत पत्रिका देण्यात येतील, अशी माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख गणेश कराड यांनी दिली. तसेच यावेळी उपसंचालक भूमी अभिलेख पुणे प्रदेश किशोर तवरेज यानी स्वामित्व योजनेच्या कार्यकक्षेबाबत माहिती दिली.
-----------------------
गावठाण भूमापन ड्रोन सर्व्हेची प्रमुख वैशिष्ट्ये
योजनेमुळे नागरिकांना होणारे फायदे
- प्रत्येक धारकांच्या जागेचा आणि मिळकतीचा नकाशा तयार होईल, या निमित्तानं सीमा निश्चित होतील आणि मिळकतीचे नेमके क्षेत्र माहिती होईल.
- प्रत्येक धारकाला मिळकतीची मालकी हक्क संबंधी मिळकत पत्रिका आणि सनद मिळेल.
- गावठाणातील जागेच्या मिळकत पत्रिकेत शेतीच्या ७/१२ प्रमाणेच धारकाच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून कायदेशीरदृष्ट्या मान्यता मिळणार आहे.
- मिळकत पत्रिके आधारे संबंधितधारकास बँक कर्ज उपलब्ध होऊ शकते, तारण करता येईल, जामिनीचा मालक म्हणून राहता येईल आणि विविध आवास योजनांचे लाभ घेता येतील.
- बांधकाम परवानगीसाठी आवश्यक असणारी मिळकत पत्रिका उपलब्ध होणार आहे.
- सीमा माहिती असल्यामुळे धारकांना आपल्या मिळकतींचे संरक्षण करता येईल.
- गावठाणातील जमीनविषयक मालकी हक्कांबाबत व हद्दींबाबत निर्माण होणारे वाद संपुष्टात आणण्यास गावठाण भूमापन नकाशे व अभिलेखांचा उपयोग होईल.
-मिळकती संबंधी बाजारपेठेत तरलता येऊन आर्थिक पत उंचावेल.
फोटो ओळी : कटफळ येथे बारामती तलुक्यातील गावठाण भूमापण ड्रोन सर्व्हे कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ड्रोनद्वारे होणारे भूमापन पाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
०४०९२०२१-बारामती-१२